10 April In History : 10 एप्रिल रोजी अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या आहेत. आजच्याच दिवशी मुंबईत आर्य समाजाची स्थापना झाली. तर, जगातील सर्वात मोठं जहाज टायटॅनिकचा प्रवास सुरु झाला. याशिवाय उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचा आज जन्मदिन आहे. याशिवाय इतिहासात आजच्या दिवशी कोणत्या घटना घडल्या हे जाणून घेऊयात.
मुंबईत आर्य समाजाची स्थापना -
समाजसुधारक, विचारवंत म्हणून स्वामी दयानंद सरस्वती यांची ओळख आहे. भारतीय समाजासाठी स्वामी दयानंद सरस्वती यांचे मोठे योगदान आहे. 10 एप्रिल 1875 रोजी मुंबईमध्ये त्यांनी आर्य समाजाची स्थापना केली होती. आर्य समाजाचा मुख्य उद्देश्य मानसिक, शारीरिक आणि सामाजिक उन्नती प्रदान करण्यासाठी झाला होता. स्वामी दयानंद सरस्वती यांनी मू्र्ती पूजा आणि धार्मिक कर्मकांडाला विरोध केला. यामुळे त्यांना जीवे मारण्याची धमकीही मिळाली होती. सतिप्रथेला विरोध करत विधवा पुनर्विवाहासाठी प्रोत्साहनही स्वामी दयानंद सरस्वती यांनी दिले होते. त्याशिवाय त्यांनी सर्व धर्माच्या अनुयायांना एकजूट होण्याचा महत्त्वाचा संदेश दिला. 1824 मध्ये स्वामी दयानंद यांचा जन्म गुजरातमधील टंकरा या खेडेगावात झाला होता. त्यांनी आयुष्यभर मानव सेवा, हीच धर्म सेवा हे वचन बाळगले होते.
नारायण राणेंचा जन्म -
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा जन्म आजच्याच दिवशी म्हणजे 10 एप्रिल 1952 रोजी झाला होता. नारायण राणे यांनी शिवसेनेत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यांचा प्रभाव कोकणमधील राजकारणात जास्त आहे. ते सध्या भाजपकडून खासदार आहेत. शिवसेनेतील अंतर्गत कलहानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर ते भाजपवासी झाले. आक्रमक भाषाशैली, आणि महाराष्ट्रातील ताकदीचे नेते म्हणून त्यांची ओळख आहे. मालवण या आपल्या स्थानिक मतदारसंघातून ते 2009 साली बहुमताधिक्याने निवडून आले, मात्र 2014 मध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर ते राज्यसभेवर खासदार आहेत. त्यांच्याकडे सुक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग खात्याची जबाबदारी आहे.
उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म
आजच्याच दिवशी भारताचे प्रसिद्ध उद्योगपती घनश्यामदास बिर्ला यांचा जन्म झाला होता. 10 एप्रिल 1894 रोजी राजस्थानमधील पिलानी येथे त्यांचा जन्म झाला होता. भारताचे प्रसिध्द उद्योगपती आणि बिर्ला समूहाचे संस्थापक म्हणून घनश्यामदास बिर्ला यांना ओळखले जाते. ते देशातील एक यशस्वी उद्योजक होते. त्यांचे भारतीय स्वतंत्र्य आंदोलनातही महत्वाचे योगदान राहिले आहे. त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात देशातील सर्व उद्योपत्तींना संघटीत करण्याचा विडा उचलला होता. ते सविनय कायदेभंग आंदोलनाचे मजूबत समर्थक होते. त्यांनी अनेक वेळा राष्ट्रीय आंदोलनासाठी आर्थिक मदतही दिली. त्यांनी सामाजिक कुप्रथेला कडाडून विरोध केला. ते गांधीवादी विचारांचे समर्थक होते. 1932 मध्ये मा. गांधींच्या नेतृत्वाखाली हरिजन सेवा संघाचे ते अध्यक्ष बनले. बिर्ला यांनी बिर्ला समूहाच्या माध्यमांतून कपडे, सीमेंट, बिस्कीट, वित्तीय सेवांसह इतर क्षेत्रातही आर्थिक साम्राज्य उभं केले.
माजी राष्ट्रपती मोरारजी देसाई यांचे निधन
भारतरत्न मोरारजी देसाई यांचे आजच्याच दिवशी 1995 मध्ये निधन झाले होते. देशाच्या जडणघडणीत त्यांनी दिलेल्या अमूलाग्र योगदानामुळे भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले होते. मोरारजी देसाई यांनी भारताचे राष्ट्रपती म्हणूनही कारभार पाहिला आहे. त्यांचा भारतीय स्वतंत्र्य चळवळीतही सहभाग होता. ते जनता पार्टीच्या सरकारमध्ये पंतप्रधान होते. आणीबाणीनंतर कॉंग्रेसविरोधी लाटेतील पहिले बिगर कॉंग्रेसी पंतप्रधान म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांनी राजकारणाच्या प्रदीर्घ कारकिर्दीत भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पद आणि पंतप्रधान पदासह देशाचे गृहमंत्री, अर्थमंत्री, भारताचे उपपंतप्रधान पदही भूषविले आहे.
टायटॅनिक बोटीचा प्रवास सुरु -
1912 मध्ये बांधले गेलेले आर.एम.एस. टायटॅनिक हे जगातील सर्वात मोठे प्रवासी जहाज होते. 10 एप्रिल 1912 रोजी इंग्लंडमधील साउथहॅंप्टन येथून हे जहाज न्यूयॉर्क शहराकडे प्रवासाला निघाले. चार दिवसांनी 14 एप्रिल 1912 रोजी उत्तर अटलांटिक महासागरामध्ये एका हिमनगासोबत झालेल्या धडकेमध्ये टायटॅनिक जहाज बुडाले. या दुर्घटनेत एकूण 2,227 प्रवासी आणि कर्मचाऱ्यांपैकी 1,517 लोक मृत्यूमुखी पडले. जगातील सर्वात विनाशकारी सागरी अपघातांपैकी हा एक अपघात मानला जातो.
ईरानमध्ये विध्वंसक भूकंप -
ईरानमध्ये 10 एप्रिल 1972 रोजी विध्वंसक भूकंप झाला होता. यामध्ये पाच हजारपेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. त्याशिवाय अनेकजण जखमी झाले होते. या विध्वंसक भूकंपामुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले होते. इमारतीच्या इमरती कोसळल्या होत्या. जिकडे तिकड्या मलब्याचा खच साचला होता. या भूकंपातून सावरण्यासाठी ईरानला बरीच वर्षे लागली होती.
डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन -
स्वतंत्र भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे निधन आजच्याच दिवशी झाले होते. 10 एप्रिल 1965 रोजी त्यांनी दिल्लीमध्ये अखेरचा श्वास घेतला होता. पंजाबराव देशमुख हे मुळचे अमरावतीचे आहेत. उच्च शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतला होता. विदर्भात शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्था काढली. या संस्थेच्या पश्चिम विदर्भात म्हणजे अमरावती विभागात एक हजारांहून अधिक शाळा आहेत. महाविद्यालये, अभियांत्रिकी पदवी, तसेच पदविका तंत्रनिकेतन, कृषी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय अशी अनेक महाविद्यालये त्यांनी सुरू केली. या संस्था आज शिक्षण क्षेत्रात फार मोठे योगदान देत आहेत. 'भूतकाळ विसरा, तलवार विसरा, जातिभेद पुरा, सेवाभाव धरा' हे पंजाबराव देशमुखांचे ब्रीदवाक्य होते.
1988 : पाकिस्तानमध्ये सैन्याच्या शस्त्रभंडारात मोठी आग लागली होती. यामुळे मोठे नुकसान झाले होते. रावळपिंडी आणि इस्लामाबाद येथील जास्त लोकसंख्या असणाऱ्या भागात ही घटना घडली होती. यामध्ये 90 जणांचा मृत्यू झाला होता तर एक हजार जण जखमी झाले होते.
2001 : नेदरलँडमध्ये इच्छा मृत्यूच्या विधेयकला मंजूरी... असे विधेयक मंजूर करणारा नेदरलँड पहिलाच देश ठरला.
2002 : लिट्टेचे प्रमुख व्ही. प्रभाकरण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. 15 वर्षानंतर ते पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांसमोर आले होते.
2010 : पोलांडमध्ये 96 जणांचा मृत्यू, राष्ट्रपतींचा समावेश
2010 मध्ये पोलांड एअरफोर्सच्या टू 154 एम विमानाला मोठी दुर्घटना घडली होती. रशियातील स्मोलेंस्कजवळ ही दुर्घटना घडली होती. यामध्ये 96 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये पोलांडचे राष्ट्रपती लेच केजिस्की, त्यांची पत्नी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश होता.
केरळमध्ये 100 जणांचा दुर्देवी मृत्यू -
2016 मध्ये केरळमधील कोल्लम येथील पुत्तींगल देवीच्या मंदिरात भीषण आग लागली होती. या आगीमध्ये 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला होता. तर 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले होते.