1st July Headlines: एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण आजपासून प्रभावी होणार आहे. तर कोकण आणि विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. तर दिल्लीतही भाजपच्या दोन मोठ्या सभा होणार आहेत. पहिली बैठक भाजपच्या सर्व आघाडीच्या अध्यक्षांची होणार आहे. तर दुसरी बैठक राष्ट्रीय सरचिटणीसांची असणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरे देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत.
ठाकरे गटाची पालिकेवर धडक
मुंबई पालिकेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून दुपारी चार वाजचा महानगरपालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचा मोर्चा निघणार आहे. रस्ते काँक्रिटीकरण घोटाळा, स्ट्रीट फर्निचर घोटाळा किंवा मग खडी घोटाळा याबाबतच्या व्यवहारात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप ठाकरे गटाकडून वारंवार करण्यात आला आहे.मुंबई महापालिका मुख्यालयावर धडकणाऱ्या ठाकरे गटाच्या मोर्चाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार, मोर्चाच्या शेवटच्या टप्प्यात उद्धव ठाकरे या मोर्चात सहभागी होणार आहेत.
भाजपकडून ठाकरे गटाच्या मोर्चाला मिळणार प्रत्युत्तर
भाजपकडून ठाकरे गटाच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता वाजता आणि दुपारी 4 वाजता असे दोन मोर्चे असतील. गेल्या 25 वर्षात सत्तेत असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने जो कथित भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे त्याची पोलखोल या प्रत्युत्तर मोर्चातून करणार आहे.
राहुल कनाल करणार शिवसेनेत प्रवेश
मोर्चाच्या दिवशी आदित्य ठाकरेंना धक्का मिळणार असून निटवर्तीय राहुल कनाल हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सध्या कनाल यांच्या विभागातील युवा सेनेची पदे ठाकरे गटाकडून स्थगित करण्यात आली आहेत.
दिल्लीत भाजपाच्या दोन महत्त्वाच्या सभा
भाजपच्या आज दोन मोठ्या सभा होणार आहेत. पहिली बैठक भाजपच्या सर्व आघाडीच्या अध्यक्षांची होणार आहे. पक्षाच्या मुख्यालयात सकाळी 11 वाजता बैठक सुरू होईल. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि बीएस संतोष या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. या बैठकीला सर्व आघाड्यांचे प्रभारी सरचिटणीसही उपस्थित राहणार आहेत. दुसरी बैठक राष्ट्रीय सरचिटणीसांची असेल जी दुपारी 4 वाजता सुरू होईल.
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण होणार
एचडीएफसी लिमिटेड आणि एचडीएफसी बॅंकेचं विलिनीकरण आजपासून प्रभावी होणार आहे. अशात एचडीएफसीचे अध्यक्ष दीपक पारेख यांनी राजीनामा देत निवृत्ती जाहीर केली आहे. शुक्रवारी एचडीएफसीच्या बोर्डाची शेवटची बैठक पार पडली, यावेळी कंपनीकडून त्यांना निरोप देण्यात आला. एचडीएफसी बॅंक आता जगातील चौथ्या वित्तीय संस्थांपैकी एक असेल ज्यात जेपी मॉर्गन, चीनची आयसीबीसी, बॅंक ऑफ अमेरिकानंतर एचडीएफसी बॅंकेचा समावेश आहे
राज्यात पावसाचा अंदाज
कोकण आणि विदर्भात दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर राज्यात 4 जुलैपर्यंत पावसाचा जोर कमी असणार असं देखील सांगण्यात येत आहे. जुलै महिन्यात महाराष्ट्रात सरासरीहून अधिक पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर संपूर्ण देशाचा विचार केला तर जून महिन्यात सरासरीच्या दहा टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे.
पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची मुदत संपली
आजपासून एलपीजी सिलेंडरपासून क्रेडिट कार्डपर्यंतच्या व्यवहारांत मोठे बदल होणार आहेत. 30 जून ही पॅन कार्डसोबत आधार कार्ड जोडणी करण्यासाठी शेवटची तारीख होती. ही दोन्ही महत्वाची कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. हे कार्ड जोडले नसतील तर प्राप्तिकर रिटर्न भरण्यात अडचण येऊ शकते. तसेच बँकेतील व्यवहार, शेअर बाजारातील व्यवहारात अडचण येऊ शकते. परदेशात क्रेडिटद्वारे खर्च केल्यास TCS लागू करण्याची तरतूद आहे, जी 1 जुलै 2023 पासून लागू कऱण्यात येणार आहे. या अंतर्गत 7 लाखांपेक्षा जास्त खर्चावर 20 टक्क्यांपर्यंत TCS शुल्क आकारलं जाईल. परंतु शिक्षण आणि वैद्यकीय वापरासाठी हे शुल्क 5 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाईल. जर तुम्ही परदेशात शैक्षणिक कर्ज घेत असाल तर हे शुल्क आणखी कमी करून 0.5 टक्के केलं जाईल.
अमरनाथ यात्रेला होणार सुरुवात
अमरनाथ गुफेत विधिवत पूजा करण्यात येणार आहे. तर आजपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होणार आहे.