बुलढाणा : लहान मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय असतात. प्रत्येकाला मुलांचा खोडकरपणा, त्यांचे लाडात बोलणे कदाचित या कारणांमुळे मुलांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील एका छोट्या मुलीचे भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहेत. कादंबरी ढमाळ असं या चिमुकलीचं नाव आहे. महत्त्वाचं म्हणजे कादंबरीचे जवळपास 1.9 मिलियन फॉलोअर्स देखील आहेत. 


बुलडाणा जिल्ह्याच्या शेगाव इथली सहा वर्षीय कादंबरी सध्या सीनियर केजीमध्ये शिकत आहे. दीड वर्षांपासून लॉकडाऊन असल्याने शाळा नावालाच. मग काय घरीच इन्स्टाग्रामवर श्रद्धा शिंदे यांचे व्हिडीओ बघितल्यानंतर कादंबरीला ते आवडले आणि तिने तिच्या वडिलांकडे श्रद्धा शिंदे यांच्यासारखे व्हिडीओ बनवण्याचा हट्ट केला. तेव्हापासून कादंबरीने व्हिडीओ बनवायला सुरुवात केली आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचं वर्णन करणाऱ्या अभिनय संपन्न व्हिडीओमुळे परिसरात ती घराघरात पोहोचली. विशेष म्हणजे शिवमुद्रा तोंडपाठ असल्याने तिचं कौतुक होत आहे. नुकतंच अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त कांदबरीने तयार केलेला व्हिडीओ चांगलाच गाजला आहे. 


सध्याच्या काळात लहान मुलांना टीव्ही, मोबाईलचे व्यसन जडले असताना, या चिमुकलीला महापुरुषांच्या विचारांवर आधारित अभिनय करावासा वाटणं, हे नक्कीच गौरवास्पद म्हणावे लागेल. कादंबरीला महापुरुषांच्या शौर्याचे वर्णनासोबतच लावण्या, डान्स, जोक्सही तोंडपाठ आहेत.  कादंबरीने मुलींना व्हिडीओच्या माध्यमातून केलेले आवाहनही खूप गाजत आहे.


'टिंडा' या अॅपवर कादंबरीचे 1.9 मिलियन फॉलोअर्स तर इन्स्टाग्रामवर साडे चार हजार फॉलोअर्स आहेत. त्यामुळे ज्या कादंबरीने अजून शाळेची पायरीही चढली नाही ती आताच सोशल मीडियात स्टार झाली आहे. कादंबरीच्या या कामगिरीवर देशभरातून  विशेष म्हणजे नामवंत मराठी कलावंत, गायक, क्रिकेटपटू, समीक्षक आदींनी तिचे व्यक्तीशः कौतुक देखील केलं आहे.


शेती आणि छोटा व्यवसाय असलेलं शेगावच ढमाळ परिवारही पुरोगामी विचारांचा असल्याने त्यांनी लहानपणापासूनच कांदबरीवर चांगले संस्कार केले आहेत. घरातून प्रोत्साहन मिळत असल्याने आपल्या अभिनय कौशल्यातून कादंबरी अभिनय क्षेत्रात चांगली कामगिरी करेल, असा विश्वास तिच्या घरच्यांना वाटत आहे. कारण शिक्षणाबरोबरच इतिहासाचे धडेही तिला देण्यात येत आहेत.