नाशिक : सोन्याची सायकल चांदीची सीट, कोमलला घेऊन मी चाललो सायगावला डबल सीट… ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरीनं लग्नात ‘एबीपी माझा’शी बोलताना घेतलेला हा उखाणा त्याच्या हृदयात एक नाजूक कोपराही आहे, हेच सांगणारा होता.


पैलवान विजय चौधरीचा विवाह एमबीए गर्ल कोमल भागवतशी नाशिकच्या बालाजी लॉन्सवर मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. विजय हा मूळचा चाळीसगावच्या सायंगावचा पैलवान. त्याचे वडील नथ्थू भिका चौधरी हे पंचक्रोशीतले नावाजलेले पैलवान. विजयनं कुस्तीचा वारसा आपल्या वडीलांकडूनच घेतला. एक पैलवान म्हणून विजय आज बारा गावचं पाणी प्यायलाय. तसंच २०१४, २०१५ आणि २०१६ अशी सलग तीन वर्षे महाराष्ट्र केसरीच्या गदेवर आपलं नाव कोरताना त्यानं गावोगावच्या पैलवानांना सायंगावचं पाणीही पाजलंय. पण उंचीनं सहा फुटी आणि अंदाजे सव्वाशे किलो वजनाच्या पैलवानाचं हृदय किती कोमलय, याचा अनुभव त्याच्या लग्नात आला. नाशिकच्या कोमल भागवतला आपण सायंगावला नेतोय हे उखाण्यातून सांगताना तो भलताच रोमॅण्टिक झाला होता.

विजय चौधरीला ट्रिपल महाराष्ट्र केसरी किताबांनी मोठी लोकप्रियता आणि पोलीस उपअधीक्षकाची मानाची नोकरीही मिळवून दिली. त्यामुळं विजयच्या लग्नासाठी अवघ्या महाराष्ट्रातून आजीमाजी पैलवान आणि त्याचे चाहतेही नाशिकच्या लग्नमंडपात दाखल झाले होते. विजय आणि कोमलचं सिंहासनाच्या रथातून तिथं आगमन झालं आणि सनईचौघड्याला फटाक्यांच्या आतषबाजीचीही जोड लाभली. विजयची पत्नी कोमल ही व्यावसायिक प्रकाश भागवत यांची कन्या असून, तिनं एमबीएचं शिक्षण घेतलंय. पण ती मूळची जलतरणपटू आहे, हे विजयसाठी अभिमानाचं क्वालिफिकेशन आहे.

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत विजय म्हणाला की, कुस्तीचा आखाडा आणि संसार या दोन अलग अलग गोष्टी आहेत. पण माझी पत्नी कोमल स्वत:ही खेळाडू असल्यानं मला समजून घेऊ शकेल. त्यामुळं यापुढच्या काळातही मला कुस्ती खेळता येईल.

विजय चौधरीनं तीनदा महाराष्ट्र केसरी आणि मग हिंदकेसरी झाल्याशिवाय लग्न करणार नाही, असं घरच्यांना बजावून सांगितलं होतं. पण कोमलला पाहिलं आणि ट्रिपल महाराष्ट्र केसरीचा कलिजा खलास झाला. विजयची बहीण मनीषाताईनं पुढाकार घेऊन ही सोयरीक जुळवून आणली. आधी विजयच्या आईवडीलांनी कोमलला पसंत केलं होतं. मग विजयरावही कोमलला पाहताक्षणी तिच्या प्रेमात पडले.

विजय चौधरीच्या लग्नाची बातमी त्याच्या चाहत्यांसाठी आनंदाची आहेच, पण त्यांच्यासाठी आनंदाची दुसरी बाब म्हणजे त्यांचा लाडका पैलवान लग्नानंतरही कुस्ती खेळायची म्हणतोय. पण पैलवान आधी जरा तुमच्या सोन्याच्या सायकलवरून बायकोला सायंगावबाहेरही फिरायला घेऊन जा. मग कुस्ती आणि पोलीस पाटीलकी आहेच की करायची.