अकोला : येत्या वर्षात गुलाबी बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र आता 'गुजरात पॅटर्न' वापरणार आहे. अकोल्यात झालेल्या बोंडअळीवरील उच्चस्तरीय कार्यशाळेत यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने ही कार्यशाळा आयोजित केली होती.


कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचीही या कार्यशाळेला विशेष उपस्थिती होती. कृषी विभागाचे राज्यभरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यावर सखोल चर्चा केली. चालू हंगाम सुरू होण्यापूर्वीच या प्रश्नावर जनजागृती आणि उपाययोजनांचा ठोस कार्यक्रम राबवण्याचं या कार्यशाळेत ठरलं.

राज्यात 2017 हे वर्ष पांढरा कापूस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी काळं वर्ष ठरलं. कारण, बीटी कपाशीवर आलेल्या गुलाबी बोंड अळीने त्यांचं सुगीचं स्वप्न पार करपून गेलं. बोंडअळीचा सर्वाधिक प्रादूर्भाव राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात पाहायला मिळाला.

राज्यात जवळपास 41 लाख हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड केली जाते. बोंडअळीमुळे यातील जवळपास 40 टक्के क्षेत्रावरील कापसाचं नुकसान झालं. यामुळे आता राज्याचा कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठं या प्रश्नावर खडबडून जागी झाली आहेत. त्याचाच भाग म्हणून अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात एका उच्चस्तरीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ आणि परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने संयुक्तपणे ही कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेला खुद्द कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांचीही उपस्थिती होती. याशिवाय कृषी विभागाचे राज्यभरातील सर्व वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ, बीटी कंपन्यांच्या प्रतिनिधींसह आणि शेतकऱ्यांचे निवडक प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

गुजरातने याआधी आलेल्या बोंडअळीच्या संकटावर यशस्वीपणे उपाययोजना करत नियंत्रण मिळवलं होतं. या कार्यशाळेत गुजरातच्या आनंद कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी यासंदर्भात सखोल सादरीकरण केलं. लवकरच राज्याचं एक पथक गुजरातला जाणार आहे. गुजरातने बोंडअळीचा प्रादुर्भाव रोकण्यासाठी केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास हे पथक करणार आहे. येत्या वर्षात गुलाबी बोंडअळीचा नायनाट करण्यासाठी महाराष्ट्र आता 'गुजरात पॅटर्न' वापरणार असल्याचं कृषीमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

बोंडअळी निर्मूलनासंदर्भातील जनजागृती भित्तीपत्रकं, घडी पुस्तिका, सीडीज आणि अॅपचं लोकार्पणही करण्यात आलं. यावेळी उपस्थित शेतकरी प्रतिनिधींनी कापूस बियाणे तंत्रज्ञानावरील अडचणी दूर करत दर्जेदार बियाणे मिळण्यातील अडचणी दूर करण्याची मागणी कृषीमंत्र्यांकडे केली.

कार्यशाळेने शिफारस केलेल्या महत्त्वाच्या बाबी

बोंडअळी निर्मूलनासंदर्भातील जनजागृती करण्यासाठी भित्तीपत्रकं, घडी पुस्तिका, सीडीज आणि अॅपचं सहकार्य घ्या

जिल्हास्तरावरील कृषीमहोत्सवांमधून शेतकऱ्यांना विशेष मार्गदर्शन करणं

बोंडअळीला अटकाव करणारे फेरोमन ट्रॅप, ट्रायकोग्रामा परोपजीवी किडींच्या वापरावर भर. हे तालुका-गावस्तरावर उपलब्धतेसाठी सरकारकडे आग्रह

जिनिंग युनिटच्या ठिकाणीही कापसातून होणाऱ्या प्रसारासाठी फेरोमेन ट्रॅपच्या वापराचा सल्ला

मान्सूनपूर्व कपाशीची लागवड शक्यतो टाळण्याचा शेतकऱ्यांना आग्रह, कपाशीच्या पिकात रोटावेटरचा वापर न करण्याचा सल्ला.

शेतकऱ्यांना सतत कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकट अडचणीत आणत आहे. पांढऱ्या सोन्यावरचं हे काळं संकट दूर करण्यासाठी सरकारच्या प्रयत्नांसोबतच शेतकऱ्यांनीही जागृत होणं तेवढंच आवश्यक आहे. तरच पुढच्या काळात गुलाबी बोंडअळीचा प्रश्न कायमचा निकाली निघू शकेल.