नागपूर : कोरोनामध्ये ज्यांच्या घरातील कमावता माणूस गेला, त्यांची दुःख, त्या वेदना समजून घेऊन संवेदनशीलतेने सर्व दस्तावेज तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. वैधव्य आलेल्या महिलांचे जीवन सुकर होण्यासाठी विविध प्रशिक्षण देवून आवश्यक योजनांचा लाभ त्यांना मिळवून दया, अशा सूचना  जिल्हाधिकारी आर. विमला यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती भवनामध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शनात जिल्हा कृती दल समिती व मिशन वात्सल्य समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये कोरोना काळात घरचा कर्ता माणूस गमावलेल्या जिल्ह्यातील जवळपास बाराशे विधवा महिलांच्या विविध लाभाच्या योजनाचा आढावा घेण्यात आला. 


या बैठकीला बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा छाया राऊत, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव डॉ. अपर्णा कोल्हे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण, तालुका बाल विकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा कृती दल समितीतील सर्व सदस्य उपस्थित होते. तालुकास्तरीय कृती दल समितीतील सदस्यांना तालुका स्तरावरील अधिकारी मदत करत नसेल तर त्यांची नावे सांगा. गावपातळीपासून तर तालुका पातळीपर्यंत यंत्रणेतील कोणताही व्यक्ती या कामी मदत करत नसेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. मात्र यानंतर जिल्ह्यातील कोणत्याही विधवेला वेळेत योजनेची मदत मिळाली नाही तर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.


कामात हलगर्जी करणाऱ्यांना नोटीस


आजच्या आढाव्यामध्ये ज्या तालुका बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी वेळेत कामे पूर्ण केली नाही. त्यांना नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी पुढील बैठकीपूर्वी वारसाहक्क प्रमाणपत्र तयार करणे, शाळेची फी देण्याची कार्यवाही करणे, बालनिधी मिळवून देणे, विधवा महिलांना त्यांच्या मताप्रमाणे कौशल्य प्रशिक्षण देणे, आधार कार्ड बनवणे, संजय गांधी निराधार योजनेतून पैसे मिळवून देणे, जन्म-मृत्यू दाखला देणे, जातीचे दाखले देणे यासाठी सर्व यंत्रणेने मदत करावी व मोलमजुरी करणाऱ्या गावातील विधवा महिलांच्या सोयीनुसार त्या ज्या वेळेस घरी असतील त्या वेळेस जाऊन त्यांना मदत करण्याचे, निर्देश यावेळी देण्यात आले.


1200 महिलांना व्यवसाय प्रशिक्षण


जिल्ह्यातील 1200 महिलांना त्यांच्या आवडीनुसार त्यांचे शिक्षण व कल बघून व्यवसाय प्रशिक्षण देण्याची सूचना त्यांनी कौशल्य विकास विभागाला दिली. प्रत्येक महिलेला त्यांच्या आवडीच्या विषयानुसार 94 महिलांना मशरुम व इतर प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यासोबतच संजय गांधी निराधार योजनेचा लाभ 772  महिलांना देण्यात आला तर श्रावण बाळ योजनेचा लाभ 102 महिलांना देण्यात आला. 100  बालकांना शैक्षणिक शुल्क भरण्यात आले तर 118 बालकांना जन्ममृत्युचा प्रमाणपत्र मिळवून देण्यात आले. समुपदेशनासाठी बालकपालक मेळावे घेण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी अर्पणा कोल्हे यांनी सांगितले.


जिल्ह्यात 3131 मुलांनी गमावले पालक


नागपूर जिल्ह्यामध्ये कोरोना काळात 79 मुलांचे आई आणि वडील दोघेही मृत्युमुखी पडले आहेत. तर आई किंवा वडील दोघांपैकी एक गमावलेले 3131 मुले आहेत. केंद्र व राज्य शासनामार्फत या मुलांना विविध योजनांचा लाभ देण्याबाबत मिशन वात्सल्य अभियानांतर्गत सुरू आहे. या अभियानाचाही आढावा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे . माननीय सर्वोच्च न्यायालयाने देखील या संदर्भात शासनाला निर्देश दिले असून कालबद्ध कार्यपूर्ती करण्याचे अपेक्षित आहे.