लातूर: टमाट्याचे (Tomato Price Hike) भाव गगनाला भिडले, त्यातून अनेक शेतकरी मालामाल झाले, मात्र वडवळ नागनाथकरांना त्याचा फायदा झाला नाही. टोमॅटोच्या गावामध्ये टमाटे नाहीत असं चित्र सर्वत्र दिसत आहे. 200 हेक्टर मागील 50 वर्षांपासून टमाट्याचे उत्पादन घेणाऱ्या वडवळ नागनाथ या गावामध्ये यावर्षी टमाट्याचे उत्पादन झालं नाही. मागील तीन वर्षांपासून टमाट्याची पडणारे भाव, त्यातून होणारा तोटा यामुळे बहुतांश शेतकऱ्यांनी यंदा टमाट्याचे उत्पादनच घेतले नाही. त्यामुळे दरवर्षी 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त टमाट्यांचे उत्पादन घेणाऱ्या गावाला यंदा आर्थिक फटका बसला आहे. 


लातूर जिल्ह्यातील टमाट्याचे गाव अशी वडवळ नागनाथची ओळख आहे. दरवर्षी या गावांमध्ये टमाट्याची उत्पादन घेणे, काढणी करणे, मार्केटिंग करणे, व्यापार करणे,  वाहतूक करणे, या सर्व बाबींची खूप धावपळ असते. मात्र ती यावर्षी दिसून येत नाही. कोट्यवधी रुपयांची उलाढाल या वर्षी झालीच नाही, अनेक व्यापाऱ्यांची दुकानं अक्षरशः ओस पडली आहेत. रोजंदारीचे मजूरही आता दुकानाकडे फिरकत नाहीत. या गावावर ही परिस्थिती ओढवली ती टमाट्यामुळेच.


लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ हे गाव मागील पन्नास वर्षापासून टमाट्याचे गाव म्हणून ओळखलं जातं. पंधरा हजार लोकसंख्या असलेले हे गाव फक्त टमाटे उत्पादक गाव आहे. या गावातून हैदराबाद, बेंगलोर, मद्रास, दिल्लीपासून थेट पाकिस्तान आणि अरब देशांमध्ये येथून टमाटे पाठवले जातात. कमी पाऊसमान असलेल्या या भागामध्ये तिन्ही हंगामात टमाट्याचे उत्पादन घेतलं जातं. यामुळे इथे 200 हेक्टरवर टमाट्याचे उत्पादन घेणाऱ्या शेतकरी, व्यापारी, मजूर ट्रान्सपोर्ट यांची कायमच वर्दळ असते. वार्षिक 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे टमाटे येथे घेतले जातात. मोठ्या व्यापाऱ्यांची वीस शेड येथे आहेत. शेकडो शेतमजूर येथे काम करतात. 


मात्र गेल्या दोन वर्षापासून ही वर्दळ पहावयास मिळत नाही. कारण आहे टमाट्याचं नित्यनेमाने पडणारे भाव. पन्नास वर्षांपासून फक्त टमाटे घेऊन शेतीचे अर्थकारण तयार झालेल्या गावात सतत दोन वर्षातील सहा हंगामात आर्थिक फटका बसला तो ही कोट्यवधीचा. यामुळे लागवड क्षेत्रात कमालीची घट झाली होती.


भाव वाढले मात्र फायदा झालाच नाही 


यावर्षी टमाट्याचे दोनशे रुपये किलोच्या घरात भाव गाठले आहेत. ज्या गावातून हजारो क्विंटल टमाट्याचं उत्पादन होते त्या गावातच टमाटे नाहीत. सातत्याने तीन वर्षातील सहा हंगामात आर्थिक फटका खाल्ल्यानंतरही काही शेतकऱ्यांनी टमाटे लावले आहेत. पुढील पंधरा ते वीस दिवसात त्यांचे टमाटे तोडणीला येतील. मात्र तोपर्यंत हा भाव राहील की नाही ही शंका आहे. त्यातच आता टमाट्यावर रोग पडत आहेत. मागील तीन वर्षात भाव नसल्याने या भागातील अनेक शेतकऱ्यांनी वेळोवेळी टमाट्याच्या शेतावर नांगर फिरवला होता. आता भाव आहे, मात्र टमाटे नाहीत अशी स्थिती झाली आहे.


ही बातमी वाचा: