Latur News:  हल्ली कोणत्या कारणांवरून तणाव निर्माण होईल, कोणाच्या भावना दुखावतील याचा नेम नाही. असाच एक प्रकार लातूर जिल्ह्यात घडला आहे. दोन गटातील तणावासाठी निमित्त ठरलंय बुरख्याचं. त्यावरून समाजातील दोन गटात वाद निर्माण झाला आहे. ही घटना आहे लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात घडली आहे. 


प्रकरण नेमकं काय?


उदगीरमधील एक अल्पवयीन जोडपं बुरखा घालून काही मित्रांसोबत चित्रपट पाहायला गेले होतं. बुरखा घातलेल्या मुलीसोबत काही मुलं चित्रपट पाहात असल्याची माहिती काही तरुणांना कळली. त्यानंतर या तरुणांनी त्या मुलांना मारहाण केलीच, शिवाय रिक्षामधून अंड्याच्या दुकानात नेऊन पुन्हा मारलं. मारहाणीचे व्हिडीओदेखील काढले. या घटनेनंतर घाबरलेल्या मुलांनी त्यांच्या पालकांना झालेला प्रकार सांगितला. त्यानंतर पालकांनी उदगीर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लगेचच चार आरोपींना अटक केली. दरम्यान, या प्रकरणी खोटे गुन्हे दाखल झाल्याचा आरोप करत दोन दिवसांपासून समाजातील काही लोक उदगीर शहर पोलीस ठाण्यासमोर आंदोलन करत आहेत.


या घटनेवरून उदगीरमध्ये आता तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या घटनेला वेगळं वळण लागत असल्याचे म्हटलं जात आहे. एका गटाच्या दाव्यानुसार, आरोपी तरुणांनी बुरखा का घातला म्हणत अल्पवयीन जोडप्याला मारहाण केली. त्याशिवाय, त्यांना बळजबरीने धार्मिक स्थळी नेत धर्मांतराचा प्रयत्न झाला. यातील बारा आरोपी पैकी फक्त चारच आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे. 


त्याच वेळेस पोलिसांनी केलेली कारवाई चुकीचे असल्याचे म्हणत दुसऱ्या गटाने पोलीस ठाण्यासमोर आंदोलन सुरू केले. इतर धर्मीयांनी बुरखा घालणं योग्य आहे का असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला आहे. यातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत असा आरोपही करण्यात आला आहे.  हे गुन्हे मागे घ्यावेत अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल असेही सागितले जात आहे. तर, पोलिसांनी दाखल असलेल्या तक्रारींनुसार कारवाई सुरू असल्याचे म्हटले आहे. 


पोलिसांनी काय म्हटलं?


ही घटना महिनाभरापूर्वीची, 12 एप्रिलची आहे. एक अल्पवयीन जोडपे चित्रपट पाहण्यासाठी गेले होते. त्यातील मुलीने बुरखा घातला होता. या मुलीसोबत इतर चार-पाच परधर्मीय मुलं असल्याचे समजताच दुसऱ्या गटाच्या मुलांनी त्यांना अडवलं. चौकशी केल्यानंतर ती दुसऱ्या समाजातील असल्याचे समोर आले. बुरखा परिधान करण्याच्या वादातून तरुणांच्या दोन गटात वादावादी, मारहाणीची घटना घडली. याची माहिती उशिरा पालकांना कळाली त्यांनी त्या संदर्भातली रीतसर तक्रार उदगीर शहर पोलीस ठाण्यात केली होती. तक्रारीत मुलीचा विनयभंग झाल्याचे म्हटले गेले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत यातील मुख्य चार आरोपींना अटक केली. 


कोणत्या गुन्ह्यांची नोंद?


पोलिसांनी या प्रकरणातील तक्रारीवरून जबर मारहाण करणे, विनयभंग करणे, पळवून नेणे, शिवीगाळ करणे आदी गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही पीडित अल्पवयीन आहेत.