लातूर : पती-पत्नीच्या पवित्र नात्याला संशयाने पछाडल्यामुळे घरं उध्वस्त झाल्याच्या अनेक घटना सतत समोर येत असतात. असाच काही प्रकार आता लातूरच्या औसा तालुक्यातील शिंदाळवाडी येथे समोर आला आहे. आपल्या पत्नीशी चुलत भावाचे अनैतिक संबंधाचा संशय असल्याने एकाने स्वतःच्या चुलत भावाचा अत्यंत निर्घृणपणे खून (Murder) केला आहे. माझ्या बायकोसोबत तुझे अनैतिक संबंध आहेत, असे म्हणत 28 वर्षीय चुलत भावावर चाकूने एकामागून एक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रदीप पापा राठोड (वय 28 वर्ष) असे मृताचे नाव असून, बालाजी सुभाष राठोड असे आरोपीचे नाव आहे. 


अधिक माहितीनुसार, लातूरच्या औसा तालुक्यातील शिंदाळवाडी येथील बालाजी सुभाष राठोड आपल्या पत्नीसह राहत होता. मात्र, आपल्या पत्नीसोबत चुलत भाऊ प्रदीप पापा राठोड याचे अनैतिक संबंध असल्याचा त्याला नेहमी संशय यायचा. याच कारणावरून तो सतत बायकोशी भांडण करायचा. विशेष म्हणजे, हत्या करण्याच्या एक दिवस आधीच त्याने याच संशयावरून आपल्या बायकोला मारहाण केली होती. तसेच आपल्या चुलत भावाला आता कायमचं संपवण्याचा त्याने निर्णय घेतला. 


पोटात व हाताच्या अंगठ्यावर एकामागून एक गंभीर वार 


संशयाने पछाडलेल्या सुभाष राठोडचा प्रदीप राठोडवर प्रचंड राग होता. त्याने त्याला कायमचं संपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे रविवारी (12 नोव्हेंबर) रोजी बालाजी राठोड याने, आपला मित्र हर्ष त्र्यंबक चव्हाण (रा. तळणी तांडा) याला बोलावून घेतले. तसेच त्याला सोबत घेऊन चुलत भाऊ प्रदीप पापा राठोड याला शोधू लागला. दरम्यान, रात्री 7 वाजण्याच्या सुमारास प्रदीप राठोड त्याला गावातच दिसला. त्याला पाहून बालाजी राठोडचा राग आणखी वाढला. तसेच, तुझे माझ्या पत्नीसोबत अनैतिक संबंध आहेत. तुला जीवंत सोडणार नाही, असे म्हणत बालाजी राठोड याने धारदार चाकूने प्रदीपच्या पोटात व हाताच्या अंगठ्यावर एकामागून एक गंभीर वार केले. तर, सोबत आलेल्या मित्र हर्ष चव्हाण याने देखील प्रदीपच्या छातीत धारदार चाकूने वार केले. या हल्ल्यात प्रदीप जागीच ठार झाला. प्रदीप मृत झाल्याचे समजताच बालाजी व हर्ष हे दोघे घटनास्थळावरून फरार झाले. 


गावात पोलिस बंदोबस्त...


दरम्यान, याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत घडलेल्या सर्व घटनेची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तर, या प्रकरणी पापाजी माणिक राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बालाजी सुभाष राठोड व हर्ष त्र्यंबक चव्हाण या दोघांविरोधात भादा पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत असून, गावात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Murder in Nanded: 'खून का बदला खून से'; भावाची हत्या करणाऱ्याच्या भावाला संपवलं; नांदेड शहर हादरलं