लातूर :  लातूरमधील सोयाबीन संशोधन केंद्रासाठी आंदोलक आक्रमक झाले आहेत. परळी येथून लातूर आजारी आईला घेऊन जाणाऱ्या धनंजय मुंडे ताफा शिवसैनिकांनी अडवला. यावेळी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी काळे झेंडे न दाखवता फक्त निवेदन दिलं. लवकरच मुंबईत बैठक घेऊन निर्णय घेणार असल्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आश्वासन दिले. 


लातूर येथील प्रस्तावित सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवनी गोवंश संवर्धन केंद्र हे बीड जिल्ह्यामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या या निर्णयाला लातूरमधील शिवसेना उद्धव ठाकरे गट काँग्रेस आणि त्याचबरोबर अनेक संघटनेने विरोध केला होता. या निर्णयाविरोधात मागील काही दिवसापासून विविध आंदोलने आणि उपोषणे सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून धनंजय मुंडे यांना लातूरत फिरू देणार नाही असा इशाराही देण्यात आला होता. 


आज धनंजय मुंडे हे परळी येथून लातूर विमानतळाकडे निघाले होते. त्यांच्या आजारी आईवर उपचार करण्यासाठी ते मुंबईकडे निघाले होते. त्यांचा गाडीचा ताफा लातूर येथे आला असता आंदोलकानी ताफा अडवला. त्यांची परिस्थिती लक्षात घेत काळे झेंडे दाखवणे किंवा कसलीही घोषणाबाजी करण्यात आली नाही. यावेळी धनंजय मुंडे यांना निवेदन देण्यात आलं. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करत त्यांनी लवकरच मुंबई येथे बैठक घेऊ आणि त्या बैठकीत योग्य तो निर्णय घेऊ अस आश्वासन दिलं आहे. 


लातूर जिल्ह्यातील प्रस्तावित सोयाबीन आणि देवणी गोवंश संशोधन केंद्र बीड जिल्ह्यात नेल्याने लातूर येथील शेतकरी आणि पक्ष संघटनांनी पवित्रा घेतलाआहे. जिल्ह्यातील अनेक बाजार समितीत बंद ठेऊन निषेध देखील व्यक्त करण्यात आला. लातूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती समोर हमाल माथाडी युनियन चे जिल्हा अध्यक्ष बालाजी जाधव हे शनिवार, 23 सप्टेंबरपासून आमरण उपोषणाला बसले. त्यांना अनेक संघटना आणि पक्षांनी पाठिंबा दर्शवला आहे .भविष्यात हे आंदोलन व्यापक होईल असं चित्र दिसत आहे. जो पर्यंत कागदोपत्री संशोधन केंद्राचा निर्णय घेतला जाणार नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही अशी भूमिका जाधव यांनी घेतली आहे.


देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध


मागील अनेक वर्षापासून होणार होणार अशी चर्चा असलेले सोयाबीन संशोधन केंद्र आणि देवणी लाल कंधारी गोवंश संशोधन केंद्र लातूर ऐवजी बिडला झाल्यानं आश्चर्य व्यक्त केले जात आहे. देवणी गोवंश आणि सोयाबीनसाठी लातूर हे देशात प्रसिद्ध आहे. असे असताना प्राथमिकता लातूर ऐवजी बीडला देण्यात आली आहे. यामुळं लातुरात याचे तीव्र पडसाद उमटले. कृषी उत्पन्न बाजार समिती एक दिवसासाठी बंद ठेवून या निर्णयाचा निषेध करण्यात आला आहे. तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्ह्यात फिरु देणार नसल्याची घोषणा शिवसेना ठाकरे गटाने केली होती. त्यास काँग्रेसनेही पाठिंबा दर्शवला होता.