लातूर : ऐन गणेशोत्सवात (Ganeshotsav 2024) एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे (ST Workers Strike) हत्यार उपसले आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिला दिवस आहे. लातूरमध्ये 396 पैकी 346 फैऱ्या रद्द करण्यात आल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाल्याचे दिसून आले. तर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या दौऱ्यानिमित्त सहाशे बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या. आता बसेसच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.  


लातूर विभागात पाच बस आगार आहेत. यात एकूण 564 बसच्या फेऱ्या होत असतात. दररोज किमान 2 हजार 750 च्या फेऱ्या होत असतात. संपूर्ण जिल्ह्यात दररोज 50 लाख रुपयांचा उलाढाल होत असते. मात्र सकाळच्या पहिल्या सत्रात अनेक बस निघाल्या होत्या. त्यानंतर संप सुरू झाला. 396 पैकी 346 फैऱ्या रद्द झाल्या आहेत. 19 हजार 197 किमी अंतरावर बसेस धावल्याच नाहीत. संप किती काळ चालेल याबाबत अनिश्चितता असल्यामुळे राष्ट्रपती दौऱ्यासाठी नियोजित बस सेवेचं काय होईल? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 


राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी 600 बसचं नियोजन


लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे बुधवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत बुद्ध विहाराचे उद्घाटन होणार आहे. शिवाय विविध शासकीय योजनेतील महिला लाभार्थ्यांचाही कार्यक्रम होणार आहे. याकरिता तब्बल 600 बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. बुद्ध विहार उद्घाटनानंतर उदगीर येथील उदयगिरी हायस्कूलच्या मैदानावर महिला सक्षमीकरणाचा कार्यक्रम होणार आहे. याकरिता जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून महिला दाखल होणार असल्याने बसेसचे नियोजन करण्यात आले आहे.


संपामुळे लातूर प्रशासनाची धांदल


लातूर विभागातील 130, नांदेडमधील 270, परभणी येथील 150 तर यवतमाळ येथील 50 बसेस लातूर विभागात आज संध्याकाळी दाखल होणार आहे. त्या-त्या डेपोतून या बसेस मुक्कामी संबंधित गावात जाणार आहेत. उद्या सकाळी 7 वाजता गावातील महिलांना घेऊन सकाळी 9 पर्यंत त्या बसेस कार्यक्रम ठिकाणी येणार आहेत. मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लातूर प्रशासनाची चांगलीच धांदल उडाल्याचे चित्र आहे.  


एसटी कर्मचाऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?


राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे,  प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.


आणखी वाचा 


एसटी कर्मचारी संपात शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची पिलावळ, गुणरत्न सदावर्ते तुटून पडले