लातूर : लोकसभेत (Lok Sabha) घुसखोरी करून चार तरुणांनी घातलेल्या गोंधळानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या चार आरोपींमध्ये महाराष्ट्रातील (Maharashtra) लातूर (Latur) जिल्ह्यातील अमोल शिंदे (Amol Shinde) नावाच्या तरुणाचा देखील सहभाग आहे. चाकूर तालुक्यातील झरी (खू.) गावात राहणारा अमोल शिंदेला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) ताब्यात घेतले असून, त्याच्यावर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हा अमोल शिंदे नेमका आहे तरी कोण असा प्रश्न आता अनेकांना पडला आहे. जाणून घेऊ यात अमोल शिंदेंची संपूर्ण माहिती... 


लोकसभेची सुरक्षा भेदत गदारोळ करणारऱ्या चार आरोपींपैकी अमोल धनराज शिंदे याचा देखील समावेश आहे. अमोल हा लातूर जिल्ह्यातील चाकुर तालुक्यातल्या झरी (बू)या गावात राहतो. दरम्यान अमोल शिंदेचे आई-वडील मजुरी करतात. तर, अमोल शिंदे हा गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस भरतीची तयारी करण्यासाठी बाहेर गावी राहत होता. ही घटना समोर आल्यावर अमोल शिंदे याच्या घरी बुधवारी पोलीस व दहशतवाद विरोधी पथकाने भेट देऊन घराची झडती घेत त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली. या घटनेमुळे पोलीस व गुप्तचर यंत्रणेने सतर्क होऊन तपास सुरू केला आहे.


अमोलच्या कुटुंबाची पार्श्वभूमी...


अमोल शिंदे याचे वडील गावच्या खंडोबा मंदिरात झाडलोट करतात. तर आई मिळेल ते मजुरीचे करते. अमोलला दोन भाऊ आहेत. एक मंदिराच्या शिखराचे काम करतो. दुसरा फरशी फिटिंगचे काम करतो. त्याच्या एका बहिणीचे लग्न झाले आहे. तर, अमोल शिंदे हा पोलीस भरतीची तयारी करत होता. मात्र, अनेकदा प्रयत्न करूनही त्याला नोकरी लागत नव्हती.  विशेष म्हणजे मागील काही दिवसांपासून अमोल सतत दिल्लीला जात असल्याचे देखील समोर येत आहे.


धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम... 


अमोलचे गावातच शिक्षण झाले. त्याचा स्वभाव शांत आणि चांगला आहे. दररोज कामाला जाणाऱ्या  आई-वडिलांना देखील तो मदत करायचा. विशेष म्हणजे पोलीस भरतीसाठी सराव करतांना अमोल धावण्याच्या स्पर्धेत नेहमीच प्रथम यायचा असे त्याच्या जवळच्या लोकांनी सांगितले. मात्र, त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेकांना प्रश्न पडला असून, या घटनेने त्यांना धक्का देखील बसला आहे. 


तपास यंत्रणा थेट झरी गावात...


संसदेत घुसखोरी केलेला अमोल धनराज शिंदे हा लातूर जिल्ह्यातील झरी (खू.) येथील रहिवासी असल्याचे समजताच प्रशासन सतर्क झाले. पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला आहे. पोलीस व दहशतवादविरोधी पथकाने अमोल शिंदे यांच्या घरी भेट देऊन अमोलसंबंधी त्याच्या घरातील कागदपत्रांची तपासणी केली आहे. तसेच, त्याच्या आई-वडिलांशी संवाद साधून अमोल बाबत माहिती देखील जाणून घेतली. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संसदेत घुसखोरी करणाऱ्या चौघांवर यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल, दिल्ली पोलिसांच्या तपासावर गृहमंत्री सभागृहात निवेदन देण्याची शक्यता