लातूर : राष्ट्रवादीचे अनेक आमदार अजित पवार गटासोबत गेले असतानाही त्यांच्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकताना दिसतोय. लातूरमध्येही राज्याचे नवनियुक्त मंत्री संजय बनसोडे यांच्या स्वागताच्या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फोटो झळकला. त्यानंतर संजय बनसोडे यांनी सांगितलं की शरद पवार हे फक्त आमच्या बॅनरवर नसून ते आमच्या हृदयात आहेत. मिळेल त्या खात्याचं योग्य आणि विकासात्मक काम करणे एवढेच माझे काम असल्याचंही ते म्हणाले. 


नवनियुक्त कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे आज पहिल्यांदाच शपथविधीनंतर लातूर शहरात दाखल झाले. लातूर शहरात ठिकठिकाणी त्यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. त्यांचा मतदारसंघ असलेल्या उदगीर विधानसभा मतदारसंघातही अनेक ठिकाणी स्वागताचे बॅनर आहेत. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांचेही फोटो झळकले आहेत. याबाबत त्यांना विचारलं असता शरद पवार बॅनरवरच नव्हे तर आमच्या हृदयात ही असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.


शरद पवार यांनी सर्वप्रथम मला संधी दिली. ते आमचे दैवत होते आहेत आणि राहणार. त्यांचा फोटो बॅनरवर लावण्यात आला आहे. ते तर आमच्या हृदयात ही आहेत. विकासाचं राजकारण आता आम्ही अजितदादा यांच्या नेतृत्वात करणार आहोत. या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार गतिमान आणि विकसनशील करण्याचा प्रयत्न आधी करणार असल्याचे प्रतिपादन कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी लातूरमध्ये बोलताना दिलं आहे.


मी पहिल्यांदा आमदार झालो आणि त्यानंतर मला राज्यमंत्रीपद देण्यात आलं. त्यावेळेस कोणतं खातं मला देण्यात आलं हा विचार मी कधीच केला नाही. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जे खातं दिलं त्या खात्याला काम करत योग्य न्याय देणे एवढंच माझे उद्दिष्ट असतं. आताही मला जे खातं वरिष्ठ नेते देतील त्याला योग्य न्याय देत विकासात्मक धोरण राबवणे हेच एक उद्दिष्ट आहे असे मत कॅबिनेट मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केलं.


लातूरमध्ये कार्यकर्त्यांची चांगलीच फळी तयार आहे. मात्र येथील दोन्हीही आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. संजय बनसोडे यांची तर थेट मंत्रीपदीच वर्णी लागली. अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी त्यात मकरंद सावे ,प्रशांत पाटील, अफसर शेख यांनीही अजित पवार यांच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतला आहे.


ही बातमी वाचा: