मुंबई : अजित पवारांसोबत मंत्रिमंडळात शपथ घेणारे उदगीरचे आमदार संजय बनसोडे पहिल्यांदाच लातूरमध्ये आले. लातूरमध्ये दाखल होताच संजय बनसोडे यांचं कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. स्वागतासाठी  रेल्वे स्थानकावर कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. प्रत्येक बॅनरवर शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित छायाचित्रे झळकत आहेत. यामुळे चर्चेला उधाण आले आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास सर्वच बडे नेते हे अजित पवार यांच्या बाजूने गेल्याने जिल्ह्यावर त्यांची पकड मजबूत झाली आहे.


लातूर जिल्ह्यातील तसंच उदगीर मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले होते. संजय बनसोडे यांच्यावर क्रेनमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. उदगीर, लातूर, त्याचबरोबर राज्यातील इतर भागात जास्तीत जास्त विकासाची काम करण्यासाठी मी प्रयत्नशील असणार, असं आश्वासन यावेळी संजय बनसोडे यांनी दिलं. महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात संजय बनसोडे यांना  राज्यमंत्रीपद देण्यात आलं होतं. लातूर जिल्ह्यातील उदगीर विधानसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदाच राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले होते. पहिल्याच वेळेस राज्यमंत्री पदाची लॉटरी त्यांना लागली होती. अजित पवार यांनी भाजपा बरोबर सत्तेत भागीदारी केली यावेळी नऊ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.त्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून संजय बनसोडे यांचा समावेश करण्यात आला आहे. पहिल्यांदाच आमदार ... महाविकास आघाडीमध्ये राज्यमंत्रीपद आणि अजित पवारांबरोबर भाजपाच्या मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळाल्याने लातूर येथील कार्यकर्त्यात उत्साह संचारला आहे 
     
जिल्ह्यातील सहा मतदारसंघापैकी दोन मतदार संघाचे प्रतिनधित्व राष्ट्रवादीचे आमदार करतात.जिल्ह्यात राष्ट्रवादीची कार्यकर्त्यांची चांगलीच फळी तयार आहे. मात्र येथील दोन्हीही आमदार हे अजित पवार यांच्यासोबत गेले आहेत. संजय बनसोडे यांची तर थेट मंत्रीपदीच वर्णी लागली.अहमदपूरचे आमदार बाबासाहेब पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक आहेत. जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी त्यात मकरंद सावे ,प्रशांत पाटील, अफसर शेख यांनीही अजित पवार यांचे आबाजूने जाण्याचा निर्णय घेतला आहे.


जाहिरातीत शरद पवार यांचा फोटो


जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जवळपास सर्वच बडे नेते हे अजित पवार यांच्या बाजूने गेल्याने जिल्ह्यावर त्यांची पकड मजबूत झाली आहे. संजय बनसोडे यांचा नागरी सत्कार उदगीर येथे होत आहे. त्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात ठिकठिकाणी बॅनर झळकले आहेत. प्रत्येक बॅनरवर शरद पवार यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची एकत्रित छायाचित्रे झळकत आहेत. यामुळे चर्चेला उधाण आला आहे.


 गतिमान विकासालाच प्राधान्य: बनसोडे


लातूरसारख्या भागातील एका सर्वसामान्य कार्यकर्त्यावर मोठ्या नेत्यांनी ठेवलेला हा विश्वास आहे. उदगीर लातूर आणि त्याचबरोबर राज्यातील इतर भागात जास्तीत जास्त गतिमान सरकारने गतिमान विकासाची काम करावीत यासाठी मी प्रयत्नशील असणार आहे.ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शनाखाली या मंत्रिमंडळात विकासाची कास धरून आम्ही काम करणार असल्याचं मत संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.