Soybean News : सोयाबीनच्या (Soybean) दरात रोज घसरण होत चालली आहे. बाजारात आवक नाही तरीही भावात घसरण होत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी चिंतेत आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्यतेलांचे भाव पडत आहेत. त्यातच केंद्र सरकारनं खाद्यतेल आयातीचे धोरण स्वीकारले आहे. याचा एकत्रित फटका सोयाबीनच्या दरावर होत असून, दरामध्ये रोजच घसरण होत चालली आहे. यामुळं शेतकऱ्यांसह व्यापारी देखील चिंतेत आहेत.
सध्या सोयाबीनला 4 हजार 900 रुपयांचा दर
सध्या जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलांच भाव पडत आहेत. त्यातच केंद्र सरकारनं खाद्य तेल आयातीचं धोरण स्वीकारलं आहे. याचा एकत्रित फटका सोयाबीनच्या दरावर होत आहे. बाजारात आवक नाही तरीही भावात घसरण होत आहे. त्यामुळं व्यापारी आणि शेतकरी चिंतेत आहेत. जागतिक बाजारपेठेत खाद्य तेलांचे भाव पडत आहेत. दरम्यान, लातूरची कृषी उत्पन्न बाजार समिती ही उच्चतम आहे. दरवर्षी दसऱ्याच्या तोंडावर बाजारात शेतमालाची मोठ्या प्रमाणात आवक असते. शेतकऱ्यांची धावपळ असते. व्यापारी अडते खरेदीदार यांची लगबग असते. मात्र, यावर्षी बाजारात अक्षरशः मरणकळा पसरली आहे. सर्वत्र शुकशुकाट आहे. दरवर्षी या वेळेला किमान 25 हजार कट्टे सोयाबीन आणि तेवढेच मूग उडीद आणि इतर शेतमाल बाजारात दाखल होत असतो. यावर्षी बाजारामध्ये दोन ते तीन दिवसापासून रोज सात ते आठ हजार कट्टे सोयाबीन आलेला आहे. सध्या आवक कमी जरी असली तरी सोयाबीनच्या बाजारभावात उठाव मात्र दिसून येत नाही. 4 हजार 900 रुपयांचा दर सोयाबीनला मिळत आहे. मागील पाच ते सहा दिवसापासून दरामध्ये घसरण सुरूच आहे.
केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण ही सोयाबीनच्या दराला मारक
जागतिक बाजारपेठेत पाम तेलाच्या दरात सतत घसरण सुरु असल्याने देशी खाद्य तेलाच्या दरामध्ये घसरण होत आहे. केंद्र सरकारचे खाद्यतेल आयातीचे धोरण ही सोयाबीनच्या दराला मारक ठरत आहे. गतवर्षी सोयाबीनचा दर उच्चांकी झाला होता. तो दर पुन्हा मिळेल या अपेक्षेमुळे गेल्या वर्षीपासून ज्या शेतकऱ्यांची होल्डिंग कॅपॅसिटी आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन स्टॉक करून ठेवला आहे. ते अद्याप बाजारात आलं नाही. ते सोयाबीन जवळपास 30 टक्के आहे. सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैशाची आवश्यकता असल्याने ते सोयाबीन मोठ्या प्रमाणात सध्या बाजारात येत आहे. लातूरच्या बाजारात जुनी सोयाबीन जवळपास 7000 कट्टे रोज येत आहे.
कर्नाटकचे सोयाबीन लातूरच्या बाजारात
अद्याप नवीन सोयाबीनची काढणी सुरु नसल्याने बाजारात सोयाबीन येण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जे दररोज दोन हजार कट्याच्या आसपास नवीन सोयाबीन येत आहे ते कर्नाटक आणि इतर राज्यातून येत आहे. दरम्यान, दर कमी असल्यामुळं शेतकरी, व्यापारी आणि खरेदीदार चिंतेत आहे. कारण आत्ता सोयाबीन कोणत्या भावाने खरेदी करायचं. पुढे कोणत्या भावाने विकायचं पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक सुरु होईल, त्यावेळेस सोयाबीनचा नेमका दर काय असेल. अशा अनेक शंका-कुशंका सध्या व्यापारी आणि खरेदीदार यांच्या मनामध्ये आहेत.
परतीच्या पावसाचाही सोयाबीनला जोरदार फटका
सोयाबीनच्या बाजारभावातील चढ उतारामुळं शेतकरी भरडला जात आहे. सोयाबीन लागवडीपासूनच सततचा पाऊस ,शंखी गोगलगाय, रोगराई या सर्व समस्यांनी पाठ सोडली नव्हती. ज्या ठिकाणी सोयाबीन तग धरुन आहेत, त्या सोयाबीनला आता परतीच्या पावसाचा जोरदार फटका बसत आहे. ज्यात शेंगा भरलेल्या आहेत, त्याला सततच्या पावसाचा फटका बसत आहे. एकरी पंचवीस हजार ते तीस हजार रुपयांचा खर्च सोयाबीन लागवडीपासून काढणीपर्यंत येत आहे. बाजार भाव जर योग्य नसेल तर काढणीलासुद्धा सोयाबीन पुरणार नाही. या मानसिकतेत शेतकरी आला आहे. आवक सुरु झाली तर सोयाबीनचे दर यापेक्षाही खाली जातील, यामुळं शेतकऱ्यांना नेमकं काय करावं ही चिंता सतावत आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
गोगलगायीमुळे नुकसान झालेल्या लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्याला मिळाली 98 कोटी 58 लाखांची मदत