Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. ठिकठिकाणी आंदोलने, उपोषणे सुरु आहेत. मराठा समाजातील तरुण आक्रमक झालेले दिसत आहे. अशातच आरक्षणाच्या मुद्यावरुन लातूर जिल्ह्यातील वातावरण देखील चांगलचं तापलं आहे. लातूर जिल्ह्यातील 25 गावातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये महिला शेतकऱ्यांचा सहभाग लक्षणीय होता. 


आंदोलनात मोठ्या संख्येनं बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा समावेश


राज्यभरामध्ये ठिकठिकाणी विविध प्रकारची आंदोलने सुरू करण्यात आली आहेत. मराठा आंदोलनाची धग महाराष्ट्रभर पसरली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी रास्ता रोको चक्काजाम आणि साखळी उपोषण करण्यात येत आहेत. आज लातूर ग्रामीणमधील मराठा आंदोलकांनी लातूर शहरांमध्ये प्रवेश केला आहे. तोही बैलगाडी आणि ट्रॅक्टरमधूनच. लातूर ग्रामीणमधील जवळपास 25 गावातील शेतकरी बांधव आपल्या कुटुंबासह आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनात मोठ्या संख्येनं बैलगाड्या आणि ट्रॅक्टरचा समावेश होता. या आंदोलनात नागझरी, रायवाडी, इंदरठाणा, जेवळी, टाकळी, सांगवी, आरजखेडा भोई, समुद्रा, गंगापूर यासह 25 गावातील शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामुळं रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड अडसर निर्माण झाला होता. प्रशासनाने वळण रस्ता करुन दिल्यानं वाहतूक संथ गतीनं सुरु होती. पाच महिला आंदोलक आणि पाच पुरुष आंदोलकांनी लातूरचे जिल्हाधिकारी वर्षा घुगे ठाकूर यांना निवेदन देत आरक्षणाची मागणी केली.


सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी आंदोलक आक्रमक होताना दिसत आहेत. आंदोलनाला हिंसक वळण देखील लागल्याचं पाहायला मिळालं आहे. एस टी बसेसची तोफोड करण्यात आली आहे. तर अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने सुरु आहेत. दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांचे देखील अंतरवाली सराटीत तीव्र आंदोलन सुरु आहे. त्यांच्या या आंदोलनाला राज्यातील मराठा आंदोलकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. 


जरांगे पाटलांनी उपोषण मागे घ्यावं, सरकारची विनंती


मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)  विषयावर सह्याद्री अतिथीगृहावर सर्वपक्षीय 32 नेत्यांची बैठक आज पार पडली. राज्यातील मराठा समाजाची दाहकता कमी करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाली.इतर समाजावर अन्याय  न होता मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) म्हणाले. हिंसाचाराच्या घटनांवर सर्वच नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे  राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. तसेच मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावं अशी विनंती देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:


Eknath Shinde: जरांगे पाटलांनी सहकार्य करत उपोषण मागे घ्यावं, सर्वपक्षीय बैठकीत मुख्यमंत्र्यांचं आवाहन