Latur Makar Sankranti 2023: स्मशानभूमी म्हटलं अनेकांच्या अंगावर काटा येतो. गावखेड्यात आजही कोणत्याही शुभ कार्याला बाहेर जाताना लोक स्मशाना समोरूनही जाण्याचं टाळत असतात. मात्र लातूर जिल्ह्यातील माकणी थोर या गावातील महिलांनी मकर संक्रांतीनिमित्त हळदी कुंकाचा जंगी कार्यक्रम स्मशानभूमीत घेतला आहे. या अनोख्या कार्यक्रमाची जिल्हाभर चर्चा आहे.
मकर संक्रांतीनिमित्त पुढील अनेक दिवस महिलांवर्ग हळदी कुंकवाचे कार्यक्रम आयोजित करत असतात. आज त्याची सुरुवात झाली आहे. माकमी थोर गावातील सर्व महिला एकत्रित येत हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेत आहेत. तोही चक्क समशानभूमीत. या गावातली समशानभूमी ही आधी काट्याकुट्यांनी भरलेली अस्वच्छ होती . मात्र गावातील तरुणांनी श्रमदान मोहीम आखली.
काही दिवसातच स्मशानभूमी ही स्वच्छ आणि सुंदर झाली. या भागात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले. स्मशा भूमीच्या प्रवेशद्वारापासून आतपर्यंत पेवर ब्लॉकचं काम करण्यात आलं. स्मशानभूमीमध्ये प्रसन्न वातावरण निर्माण झालं. गावातील तरुण काहीतरी धडपड करतायेत आणि नाविन्यपूर्ण बाबी करतायेत हे लक्षात आल्यामुळे गावातील महिलांनीही पुढाकार घेतला.
महिलांनी चक्क स्मशानभूमीत मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला. गावातील तब्बल 200 महिलांनी या हळदीकुंकवाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत स्मशानभूमीकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला.
बीडमधील महिलाच्या उपक्रमाचीही झाली होती चर्चा
समाजातील काही प्रथांमुळं विशिष्ट वर्गाला मात्र सणाचा भाग होता येत नाही. मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हटलं सौभाग्याचं लेणं लेऊन साजरा केला जाणारा सण. आपापसात गोडवा निर्माण व्हावा म्हणून महिला तीळगूळ वाटून मकरसंक्रांत साजरी करतात. याच मकरसंक्रांतीला विधवा महिलांना देखील तेवढाच सन्मान मिळावा म्हणून बीडमध्ये 'मकर संक्रात कुंकवा पलीकडची' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. बीडच्या काकडहिरा गावात विधवा महिलांच्या सन्मानासाठी मकरसंक्रातीचा सोहळा रंगला. प्रतिभा हावळे आणि मनीषा जायभाये या दोघी मैत्रिणी गेल्या पाच वर्षांपासून वेगवेगळ्या गावात संक्रांतीच्या सणानिमित्त या कार्यक्रमाचं आयोजन करतात.. विधवा झाल्यानंतर आपल्याला जी वागणूक मिळाली ती इतर महिलांना मिळू नये म्हणून या दोघींनी या उपक्रमाची सुरुवात केली. कुणाला अपघाताने तर कुणाला नशिबाने अकाली विधवापण येते म्हणून त्यांना कायम दुय्यम वागणूक दिली जाते. म्हणूनच कुकंवा पलीकडची ही संक्रांत आपल्या समाजा समोरचा मोठा आदर्श म्हटला पाहिजे.
ही बातमी देखील वाचा
PHOTO: मकरसंक्रांतीला सौभाग्याचं लेणं विधवांच्याही पदरी; बीडमधील अनोख्या उपक्रमाचं होतंय कौतुक