लातूर :  लातूर जिल्ह्यात पावसाने (Latur) पाठ फिरवल्याचे परिणाम आता जाणवू लागले आहेत. जिल्ह्यातील 171 लहान मोठ्या प्रकल्पात मिळून 25 टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती समोर आली आहे. मांजरा धरणात (Manjara Dam) ही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. मांजरा धरणातून लातूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (MIDC) सुरू असलेला पाणीपुरवठा बंद (Water Cut) करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे आणि परतीच्या पावसाचीही शक्यता धूसर दिसत असल्याने जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, शहराच्या पाणीपुरवठ्यातही कपात होण्याची शक्यता असून, सध्या पाच ते सहा दिवसाआड सुरू असलेला पाणीपुरवठा आठ ते दहा दिवसाआड करण्याबाबत निर्णय  घेण्यात आला आहे. शहरी भागात मोठ्या संख्येने सुरू असलेल्या बांधकामावरही निर्बंध घालण्यात येणार आहेत.


पावसाने यंदा कमालीची ओढ दिली असून, खरिपातील पिकांसोबत जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. यातूनच पिकांचे मोठे नुकसान झाले. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना आगाऊ भरपाई देण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. यासाठी पिकांचा मिडसिझन सर्वे करण्याचे आदेश दिले असून, कृषी विभाग आणि विमा कंपनीकडून पिकांचा संयुक्त सर्वे सुरू आहे. दुसरीकडे पावसाने ओढ दिल्याचा परिणाम पाणी योजना असलेल्या प्रकल्पावर होत आहेत. या स्थितीत ऊसाचे पीक जगवण्यासाठी शेतकरी चोरून पाण्याचा उपसा करत असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी शिल्लक राहणार नसल्याची भीती आहे. जिल्ह्यासाठी उपयुक्त बहुतांश मोठ्या, मध्यम व लघू प्रकल्पामध्ये सध्या 24 टक्के पाणीसाठा आहे. हे पाणी पुरेसा पाऊस पडेपर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी टिकवून ठेवण्याचे आव्हान सध्या प्रशासनासमोर आहे. यामुळे जिल्हाधिकारी वर्षात ठाकूर यांनी पहिले पाऊल टाकत मांजरातून असलेल्या एमआयडीसीच्या योजनेतील पाणीपुरवठा कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.


पावसाळ्याची दोन महिने होत आली आहेत. मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षाच पेरणी एवढा पाऊस झाला. मात्र त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. अत्यल्प पावसाचा परिणाम जिल्ह्यातील सर्व प्रकल्पांवर झाला आहे.


लातूर जिल्ह्यात जलसंपदा विभागाच्या एकूण 171 प्रकल्पात 25 टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. यात 2 मोठे प्रकल्प, 8 मध्यम प्रकल्प, 134 लघु प्रकल्प तसेच 27 बंधाऱ्याचा समावेश आहे. या सर्व प्रकल्पात आज रोजी 191 दशलक्ष घनमीटर (25 टक्के) उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी आज रोजी 529.88 दलघमी (69 टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता.


जिल्ह्यातल्या व्हटी  आणि तिरु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा शून्यावर आला आहे . तर इतर सहा प्रकल्पांमध्ये केवळ 25  टक्के पाणीसाठा उरला आहे.


लातूर जिल्ह्यातल्या आठ मध्यम  प्रकल्पांमध्ये असलेला पाणीसाठ्याचे प्रमाण असे आहे.


तावरजा- 2 टक्के 
रेणापूर- 24 टक्के
व्हटी- 00
तिरु-00
देवर्जन- 39 टक्के
घरणी- 28 टक्के
मसलगा- 30 टक्के
साकोळ- 54  टक्के


लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची अवस्था ही गंभीर बनली आहे. मांजरा धरणात 25 टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक राहिला आहे.