Latur News: लातूर जिल्ह्यातील (Latur District) आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला असून, एका 22 वर्षीय तरुणाला वेळेत उपचार न मिळाल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रातील ही घटना असून, एका 22 वर्षीय तरुणाला विजेचा धक्का बसला होता. त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले असता, डॉक्टर रुग्णालयात उपलब्ध नसल्याने त्याच्यावर उपचार करण्यासाठी वेळ झाला. ज्यात त्याचा मृत्यू झाला असल्याच रुग्णाच्या नातेवाईकांनी आरोप केला आहे. आनंद निळकंठ भोकरे (वय 22 वर्षे, रा. तांबरवाडी) असे मृत तरूणांचे नाव आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, आनंद भोकरे हा तरुण रात्री आठ-साडेआठ वाजेच्या दरम्यान घरातील विजेचे काम करत होता. दरम्यान त्याला विजेचा धक्का बसला. हा प्रकार नातेवाईकांच्या लक्षात येताच त्यांनी त्याला तात्काळ जखमी अवस्थेत लामजना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र यावेळी कर्तव्यावर असलेले वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा मुळे तिथे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांच्याशी संपर्क केला. मात्र साडेआठ वाजता संपर्क केल्यावर त्या रात्री साडेदहा नंतर तिथे दाखल झाल्यात. मात्र तोपर्यंत आनंद भोकरे याने जीव सोडला असल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकांनी केला आहे. 


उलट नातेवाईकांना अरेरावीची भाषा


दरम्यान या घटनेने रुग्णाच्या नातेवाईकांनी वैद्यकीय अधिकारी डॉ सुरेखा मुळे यांना जाब विचारला असता, उलट त्यांनी अरेरावी केली. तर वैद्यकीय अधिकारी यांनी अरेरावीची भाषा करत तुम्ही मला मारायला आलात का असा प्रतिप्रश्न करत रुग्णाच्या नातेवाईक यांना दम भरला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. 


अन्यथा प्रेत ताब्यात घेणार आहे...


लामजना प्राथमिक आरोग्य केंद्रात आजूबाजूच्या अनेक गावातील रुग्ण सतत उपचारासाठी येत असतात. त्यामुळे या ठिकाणी निवासी वैद्यकीय अधिकारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र असे असताना देखील डॉक्टर याठिकाणी उपस्थित राहत नाही. याबाबत परिसरातील गावकऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहे. पण त्याकडे प्रशासनाने नेहमी दुर्लक्ष केले. त्यामुळे एका तरुणाचा आज जीव गेला असल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान या घटनेने मृत तरुणाच्या नातेवाईकांनी आणि मित्रमंडळींनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी तसेच, जिल्हा परिषदेचे सीईओ यांनाही फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून फोन उचलला गेला नसल्याने नातेवाईक हतबल झाले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी यातील दोषी अधिकाऱ्यांवर जोपर्यंत कडक कारवाई होत नाही, तोपर्यंत प्रेत ताब्यात घेणार नाही अशी भूमिका घेतली आहे.


इतर महत्वाच्या बातम्या: 


HIV बाधित मुलांचे संगोपन करणार्‍या रवी बापटले यांच्यावर गुन्हा दाखल, जाणून घ्या काय आहे प्रकरण