Maharashtra Latur NEET Paper Leak Case: लातूर : नीट पेपरफुटी प्रकरणाला (Paper Leak Case) पुन्हा एकदा वेगळं वळण मिळालं आहे. शनिवारी सकाळपासून नीट (NEET Exam) पेपरफुटी प्रकरणी विविध घटना घडामोडी घडत होत्या. मात्र लातूर (Latur) पोलिसांकडून कोणतीही माहिती समोर येत नाही. यामुळे संभ्रम वाढत चालला आहे. रविवारी रात्री नऊ वाजल्यापासून दोन वाजेपर्यंत वेगवान हालचाली झाल्या आहेत. शनिवारी एटीएसनं (Nanded ATS) चौकशी करून सोडून दिलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयात पोलीस अधीक्षक सोमय मुंडे लातूर स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी शहर पोलीस उपाधीक्षक आणि इतर अधिकाऱ्यांसमोर पठाण यांची चौकशी करण्यात आली. रात्री बारानंतर पोलिसांनी तपासासाठी विविध पथकं तयार केल्याची माहिती आहे. याबाबत कोणतेही अपडेट देण्यास पोलीस तयार नाहीत. मात्र, पेपरफुटी प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारपासून आतापर्यंत यात किती लोकांची चौकशी झाली? किती लोकांविरोधात गुन्हा दाखल झाला? याबाबत स्पष्टता नाही. मात्र जाधव आणि पठाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असल्याची खात्रीलायक माहिती आहे.
नीट पेपरफुटी प्रकरणी लातुरात वेगवान हालचाली
शनिवारी सकाळपासून नांदेड येथील पथक लातूर शहरात माहिती घेत होतं. तपास करत होतं. त्यानंतर त्यांनी पठाण आणि जाधव नावाच्या दोन जिल्हा परिषद शिक्षकांना चौकशीसाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणलं होतं. त्यांची चौकशी करण्यात आली. त्यांच्या मोबाईलमधील डेटाची माहिती घेण्यात आली. यानंतर दोघांनाही सोडण्यात आलं होतं.
पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन शिक्षकांपैकी पठाण यांनी माध्यमांसमोर येत, मला चौकशीसाठी बोलवलं होतं. पोलिसांनी सन्मानांना मला रात्री घरीही सोडलं होतं अशी माहिती दिली. विनाकारण माझी बदनामी केली जात असल्याची तक्रारही त्यांनी केली होती. या सर्व बाबी संध्याकाळी पाच वाजता त्यांनी माध्यमांसमोर स्पष्ट केल्या होत्या. मात्र, अवघ्या तीन तासांत पठाण यास पोलिसांनी ताब्यात घेतलं. गुन्हाही दाखल केला. पोलीस अधीक्षकापासून विविध अधिकारी आणि पथकांनी कसून चौकशी केली. या प्रकरणातील दुसरे शिक्षक जाधव हे पोलिसांच्या ताब्यात आहेत का? याबाबतची माहिती मात्र पोलिसांनी दिली नाही. त्यांचा शोध सुरू असल्याचीही माहिती समोर येत आहे.
कोण आहेत हे दोन शिक्षक?
नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोन शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील असून एका लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.
वैद्यकीय पदवी प्रवेशासाठीच्या परीक्षेत (नीट) घोटाळा झाल्याचा आरोप होत आहे. लातूरमध्येही नीट आणि जेईईच्या तयारीसाठी मोठ्या संख्येनं विद्यार्थी खासगी कोचिंग क्लासेसमध्ये प्रवेश घेत असतात. त्यामुळे परीक्षा गैरव्यवहारात या शहराचे काही धागेदोरे आहेत का? या दृष्टीनं तपास सुरू होता. शनिवारी रात्री नांदेड एटीएसच्या हाती हे दोघे शिक्षक लागले. त्यानंतर चौकशी करून त्यांना सोडण्यात यायला हवं होतं. मात्र, रविवारी संध्याकाळी पुन्हा यातील पठाण नावाच्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात दोन पेक्षा अधिक लोकांचा समावेश असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या अनुषंगानं पोलिसांचा तपास सुरू आहे.
जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग सज्ज
शिक्षण विभाग जिल्हा परिषद लातूर यांना या घटनेची माहिती सकाळी मिळाल्यानंतर त्यांनी कातपूर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक जलील पठाण यांच्या विषयी माहिती गोळा करायला सुरुवात केली. या शाळेतील सर्व कागदपत्रं सील करण्यात आली आहेत. अशी माहिती आता समोर आली आहे. यातील दोन्ही शिक्षक हे जिल्हा परिषद शाळेत कार्यरत आहेत. अजून काही जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या वाढण्याची शक्यता दाट असल्याची माहिती आहे.
या दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. इतर राज्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार काय आहेत. किती आहेत याची माहिती तपासाअंती समोर येणार आहे. राज्यभरात कुठे कुठे यांचे कनेक्शन आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. मागील दोन दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली असल्याचं दिसून येत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :