Latur NEET Exam Paper Leak Case : लातूर : देशभरात गदारोळ माजवणाऱ्या नीट पेपरफुटीचे धागेदोरे (NEET Paper Leak Case) आता महाराष्ट्रात सापडले आहेत. लातुरातून (Latur) नांदेड एटीएसनं (Nanded ATS) दोन जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना ताब्यात घेतलं होतं. त्या दोन्ही शिक्षकांविरोधात आता नीट पेपरफुटी प्रकरणी (NEET Exam) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या शिक्षकांची कसून चौकशी सुरू होती. अशातच या शिक्षकांकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी आतापर्यंत चार शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी तीन जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, याप्रकरणी आणखी काही जणांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. 


लातूर नीट घोटाळा प्रकरणी एटीएसनं या प्रकरणाची माहिती घेऊन लातूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांच्याकडे 12 विद्यार्थ्यांचे अॅडमिट कार्ड सापडले आहेत. हे अॅडमिट कार्ड पोलिसांनी पुढे पाठवलेले आहेत. आता हे कोणाकडे पाठवले आहेत? याची माहिती एटीएसनं दिलेली नाही. पण तरी या प्रकरणात मोठा आर्थिक व्यवहार झाल्याची देखील एटीएसला शंका आहे. 


नीट पेपरफुटी प्रकरणी तपासाला वेग, दोन शिक्षकांविरोधात एफआयआर दाखल 


नीट पेपरफुटीप्रकरणी तपासाला आता वेग आल्याचं पाहायला मिळतंय. नांदेड ATS नंतर लातूर पोलीसही सक्रिय झाले आहेत. नीटप्रकरणी दोन शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण अशी या शिक्षकांची नाव आहेत. पेपरफुटी प्रकरणात या शिक्षकांचा सहभाग असल्याचा एटीएसला संशय आहे. दरम्यान, या दोन शिक्षकांपैकी पठाण शिक्षक पोलिसांच्या ताब्यात आहे. दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्र एटीएसच्या तक्रारीवरून ही एफआयआर नोंदवण्यात आली असून, त्यात एटीएसनं चौकशी केलेल्या दोन शिक्षकांनाही आरोपी केलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. पोलिसांनी हा एफआयआर आयपीसीच्या कलम 420 आणि 120 (बी) आणि सार्वजनिक परीक्षा (प्रतिबंध आणि अन्यायकारक) च्या संबंधित कलमांखाली नोंदवला.


नीट पेपरफुटी प्रकरणात अटक झालेले ते दोन शिक्षक कोण? 


नीट पेपरफुटी प्रकरणी ताब्यात घेण्यात आलेले दोन शिक्षक जिल्हा परिषद शाळेतील असून एका लातूर आणि एक सोलापुरात कार्यरत आहेत. लातूरमध्ये राहणारे संजय जाधव हे मूळचे बोथी तांडा (ता. चाकूर) येथील रहिवाशी आहेत. सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ते कार्यरत आहेत. लातूरच्या अंबाजोगाई रोड भागांत राहणारे जलील उमरखाँ पठाण हे तालुक्यातील कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत.


दरम्यान, या दोन शिक्षकांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाला असल्याची माहिती आहे. इतर राज्यांमध्ये झालेले आर्थिक व्यवहार काय आहेत. किती आहेत याची माहिती तपासाअंती समोर येणार आहे. राज्यभरात कुठे कुठे यांचे कनेक्शन आहेत? याबाबतचा तपास सुरू झाला आहे. मागील दोन दिवसांत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गुप्तता पाळली असल्याचं दिसून येत आहे.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI