लातूर: आजकाल इन्स्टाग्रामच्या रीलचं वेड तरुणाईच्या इतक्या डोक्यात गेलं आहे की, त्यांना वेळ अन् काळाचंही भान राहत नाही. रील्सवाले कुठेही सुरु होतात आणि कधी-कधी अडचणीतही येतात. लातुरात अशाच एका तरुणाला पोलिस ठाण्याच्या आवाराल व्हिडीओ रील काढणं चांगलंच महागात पडलंय. या प्रकरणात पोलिसांनी त्या तरुणाच्या डोक्यावरचे केसही काढले आणि डोक्यातील हवाही काढली. 


आभासी जगात सकाळी बनला हीरो अन् नंतर पोलिसांनी त्याच्यावर हात साफ केला. त्यानंतर त्या तरुणाचे डोक्यावरचे केसही गेले आणि हवाही गेली. यासंबंधीत व्हायरल होणारे दोन्ही व्हिडीओ सध्या चांगलेच चर्चेत आहेत.


सिद्धांत उदगीरकर उर्फ मित्राचा लाडका सिद्धू हा लातूर येथील विवेकानंद पोलीस ठाण्यात काही कामानिमित्त आला होता. मात्र जाताना त्याने सोशल मीडियात हवा करण्यासाठी ठाण्याबाहेर येतानाचा रावडी लूकमधील व्हिडीओ बनविला. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून तो व्हायरलही केला.


काही वेळात याची माहिती विवेकानंद पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना कळाली. मग काय सिद्धूचा अवघ्या काही तासात शोध घेण्यात आला. त्यास ठाण्यात बोलवण्यात आले. पोलिसांनी 'उत्तम' वागणूक दिल्यानंतर सिद्धूला आपली चूक लक्षात आली. पोलिसांनी सिद्धूच्या उडणाऱ्या केसावर हात फिरवून त्याला चांगलीच समज दिली होती. 


पोलिसांनी दिलेल्या समजानंतर त्याने आपली चूक मान्य करणारा व्हिडीओही बनवला. ज्या वेगात त्याचा रावडी लूक व्हायरल झाला होता, त्याच वेगात त्याने चूक मान्य केलेला व्हिडीओही व्हायरल झाला. मात्र या व्हिडीओमध्ये त्याच्या डोक्यावरचे केस गायब झाले होते आणि हा फरक अनेकांच्या लक्षात आला.


सिद्धूने माफी मागत केलेला व्हिडीओ चांगलाच व्हायरल झालेला आहे. सिद्धूने त्याचा एकच व्हिडिओ व्हायरल केला होता, मात्र लातूरकरांनी सिद्धूचे दुसराही व्हिडीओ वेगवेगळ्या गाण्यांवर मिक्स करत तूफान व्हायरल केला आणि भावाची चर्चा उडवून दिली. 


पोलिसाची सोशल मीडियावर करडी नजर


लातूर पोलिसांनी मागील अनेक महिन्यांपासून एक मोहीम राबवली आहे. सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असणारे जे सिद्धूसारखे तरुण आहेत, ते अनेक प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करत असतात. हातात तलवार घेणारे, बंदूक घेणारे, तलवारीने केक कापणारे, तलवार नाचणारे, सोशल मीडियावर विरोधी गटाला थेट जीवे मारण्याची किंवा इतर इजा करण्याची धमकी देणारे व्हिडीओ कोणी पोस्ट करत असेल तर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करत समज दिली जाते. ही मोहीम फक्त लातूर शहरातच नव्हे तर जिल्ह्याभरात मागील अनेक महिन्यापासून राबवण्यात येत आहे.


ही बातमी वाचा: