Latur News : लातूरमध्ये (Latur) तीन वर्षापूर्वी मुसळधार पावसामुळे आलमला-उंबडगा ओढ्यावरील पूल (Bridge) वाहून गेला होता. तेव्हापासून आलमला गावाशी संपर्क तुटलेलाच आहे. त्यात दोन वर्षे कोरोनामुळे (coronavirus) शाळेला जाता आले नाही. यंदा उंबडगा येथील विद्यार्थ्यांना कधी कमरेएवढ्या तर कधी गुडघ्याएवढ्या पाण्यातून जात शाळेला जावे लागत आहे. याकडे ना प्रशासनाचे, ना लोकप्रतिनिधींचे लक्ष जात आहे. दुर्दैवी घटना घडल्याशिवाय हे लक्षच देणार नाहीत का असा प्रश्न आता गावकरी विचारत आहेत. विद्यार्थ्यांना जीवघेणा ओढा ओलांडून प्रवास करत आलमल्याची शाळा गाठावी लागत आहे. परंतु, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला या विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय दिसून येत नसल्याने पालक व ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.


आलमला ते उंबडगा (बु.) ओढ्यावरील वाहतुकीचा पूल गेल्या तीन वर्षापूर्वी पावसाच्या पाण्यामुळे पूर्णतः वाहून गेला आहे. तेव्हापासून औसा-आलमला-उंबडगा बु.-बुधोडामार्गे लातूर जाणारी आणि परत याच मार्गाने येणारी बस तीन वर्षांपासून बंद केली आहे. त्यामुळे उंबडगा बु. आणि उंबडगा खु. या दोन गावांतील विद्यार्थी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यातच आता औसा-आलमला-गंगापूरमार्गे लातूर बस सुरु आहे. त्यात पूल वाहून जाणे आणि रस्त्याची दूरवस्था यामुळे ही बस बंद केली आहे. आता रस्ता आणि पुलाचे काम झाल्यास पुन्हा बससेवा सुरुळीत होईल. परंतु आधी रस्त्याचे काम होणे गरजेचे आहे.


पुलाची दुरुस्ती वा नवीन पूल बांधकामाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. त्यामुळे उंबडगा बु., उंबडगा खु आणि अन्य गावांतील नागरिकांना आलमल्याला जायचे असेल तर लांबून वळसा घालून जावे लागते. ही पायपीट मागील तीन वर्षांपासून सुरु आहे. आलमला हे मोठे गाव असून, गावात विश्वेश्वरय्या पॉलिटेक्निक महाविद्यालय आणि बी. फार्मसी, डीफार्मसी आणि अन्य विविध शिक्षण घेण्यासाठी शेकडो विद्यार्थी तसंच पालक याच मार्गावरुन म्हणजे आलमलामोड उंबडगा बु.मार्गे आलमला जातात. परंतु, पूल वाहून गेल्याने त्यांना लातूरहून गंगापूरमार्गे किंवा औशाहून जावे लागत आहे. तसेच रामनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षणासाठी उंबडगा येथील विद्यार्थी जातात. त्याचप्रमाणे आलमला येथे जिल्हा बँकेची शाखा असून, येथे शेतकऱ्यांचा नित्य व्यवहार असतो. शेतकऱ्यांनाही औशाहून यावे लागते. 


आता मागील पंधरा दिवसांपासून संततधार पाऊस चालू आहे. पाऊस सुरु झाला की ओढ्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. आलमला इथे शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कमरेएवढ्या पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. त्यात भरीस भर म्हणून आलमलामोड ते आलमला गावादरम्यानच्या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. गुडघ्याएवढे खड्डे पडले होते. दोन महिन्यांपूर्वी या खड्डयात आलमलामोड ते उंबडगा बु. दरम्यान मुरुम टाकला आहे. परंतु, संततधार पावसामुळे या मुरुमाचे मातीत रुपांतर होऊन अनेक गाड्या स्लिप होऊन पडल्या. ओढ्यावरील पूल वाहून गेल्याने सतत पूर येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना ओढ्याच्या पलिकडे सोडायचे म्हटले की सोल लावून किंवा हाताला धरुन नित्य सोडावे लागते. औसा किंवा अन्य ठिकाणी पाऊस पडला की सर्व पाणी या ओढ्याला येते. या ओढ्याचे पाणी पुढे तावरजा नदीला जाऊन मिळते. हा जीवघेणा प्रवास थांबवण्यासाठी प्रशासनाने तात्काळ तात्पुरती सोय करुन द्यावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Yavatmal Rain : यवतमाळ जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती, जीव धोक्यात घालून विद्यार्थ्यांचा प्रवास


Nashik Surgana Flood : सुरगाण्यातील विद्यार्थ्यांचा भर पुरातून शाळेचा प्रवास, प्रशासन जागे कधी होणार? 


Nanded Rains : बोहल्यावर चढण्यासाठी नवरदेवाचा महापुरातून प्रवास, थर्माकॉलच्या होडीतून 7 किमी अंतर कापून नवरदेव मांडवात पोहोचला