Yavatmal Rain : यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्यात मुसळधार पावसानं (Heavy Rain) जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. पुराचं पाणी गावात शिरल्यानं नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे. या पुराच्या पाण्यामुळं ग्रामीण भागात जाणारे रस्ते बंद झाल्यानं वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी नागरिकांना जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे. दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीला देखील पूर आला आहे. या नदीच्या पुलावरुन जीव धोक्यात घालून नागरिकांसह विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांमध्ये भितीचं वातावरण आहे.




यवतमाळ जिल्ह्यात सध्या पुरानं थैमान घातलं आहे. विशेषत: ग्रामीण भागातील रस्तेच बंद झाले आहेत. मात्र, अशाही परिस्थितीत नागरिकांना जीव धोक्यात घालून वाट काढावी लागत आहे. दारव्हा तालुक्यातील राजूरा गावाजवळून वाहणाऱ्या कुपटा नदीवरुन नागरिकांना जीव मुठीत धरुन वाट काढावी लागत आहे. पुपटा नदीवर पूल आहे. मात्र, थोडासा पूर येताच तो पाण्याखाली गडप होतो. अशावेळी नागरिकांना नदीवरच बांधलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्यावरुन जावं लागतं. बंधाऱ्याच्या गेटसाठी सोडलेला तब्बल 4 ते 5 फुटांचा गॅप ओलांडण्यासाठी जीव धोक्यात घालून उडी मारावी लागते. अशा धोक्याच्या स्थितीत विद्यार्थी प्रवास करत आहेत.




हातणी या गावात इयत्ता चौथीपर्यंतच शाळा असल्यानं मुले दारव्हामधील शाळेमध्ये शिकायला जातात. अनेकदा पाऊस सुरु झाला की त्यांना सुट्टी दिली जाते. मात्र, राजूरा गावाजवळील या पुलावर पूर असल्यास शेवटी नाईलाजाने बंधाऱ्यावर चढावे लागते. शाळकरी मुले आणि महिलांसाठी काही नागरिक राजूरा गावातून पाटी आणून या बंधाऱ्याच्या गॅपमध्ये ठेवतात. त्यावरुन कसरत करत वाट काढावी लागते. पावसाळ्यात हातणीच्या शाळकरी मुलांसह नागरिकांसाठी हा जीवघेणा प्रवास नित्याचाच ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील अनेक गावांचा पुराचा तडाखा बसला आहे. वणी तालुक्यातील भुरकी, जुनाड, कवडशी, सावनगी, शिवणी, चिंचोली,  जुगाद, सेलू, झोला रांगणा, कोना, पिंपळगाव, नायगाव, उकणी , शेलू, कवडशी, शिवणी,  चिंचोली या गावांना देखील पुराचा फटका बसला आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: