लातूर:  राज्य सरकारने खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयास परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. मात्र सरकारच्या या निर्णयाला पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठा विरोध केला आहे. हे कमी होते की काय म्हणून डिप्लोमा इन व्हेटर्नरी सायन्स हा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. यामुळे राज्यभरातील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष पसरला आहे. या दोन्ही निर्णयाच्या विरोधात विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले आहेत. मागील काही दिवसापासून महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आता रॅली काढत आपला संताप व्यक्त केला आहे.


लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय संपूर्ण राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे.राज्यभरातून अनेक विद्यार्थी येथे पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येत असतात. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचा येथे जोरदार विरोध होत आहे .


काय आहेत विरोधाची कारणे?


व्हेटर्नरीची पदवी घेऊन डॉक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरी लागतच नाही अशी स्थिती आहे. खासगी प्रॅक्टिसशिवाय त्यांना पर्याय नाही.चार हजार पशुवैद्यकीय डॉक्टरच्या जागा रिक्त आहेत त्या तात्काळ भरण्यात याव्या. ही खूप जुनी मागणी सरकार पूर्ण करत नाही. त्यात या क्षेत्रात वाढलेल्या बेरोजगाराने विद्यार्थी यापूर्वीच त्रस्त आहेत.अशी सर्व परिस्थिती असताना खासगी पशुवैद्यकीय महाविद्यालयाला परवानगी देऊन बेरोजगारीत वाढच होत नाही का असा प्रश्न विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यातच डिप्लोमा इन व्हेटर्नरी सायन्स हा पदविका अभ्यासक्रम ही सुरू होतोय. यामुळे शिक्षण घेणारे विद्यार्थी मिळतील मात्र बेरोजगारी वाढेल त्याबाबत सरकार बोलायला तयार नाही. यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.


शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाची अवस्था अत्यंत बिकट


राज्यातील पाचपैकी तीन पशुवैद्यकीय महाविद्यालय त्यात नागपूर सातारा आणि परभणी येथे कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे 2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देताना मज्जाव करण्यात आला होता. साल 2017 रोजी अकोला आणि जळगाव येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाची मंजुरी देण्यात आली होती. मात्र अद्यापपर्यंत तिथे कोणतीही प्रक्रिया झाली नाही.कागदपत्रे घोषणा झाली मात्र प्रत्यक्षात काहीच नाही. शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. असे असताना जी अस्तित्वात आहेत तीच महाविद्यालय नीट चालत नसताना आता खाजगी महाविद्यालयाचा घाट का घातला जात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय.


विद्यार्थ्यांची आंदोलनाची भूमिका


शुक्रवारी उदगीर येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयापासून रॅलीस सुरुवात केली. नाईक चौक शिवाजी महाराज चौक मार्गे तहसील कार्यालयात रॅली पोहचली. तहसीलदाराला निवेदन देत रॅलीची सांगता करण्यात आली. राज्यातील इतर पशुवैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे.


हे ही वाचा :


लातूर जिल्ह्यातील औराद शहाजानीला तालुक्याचा दर्जा देण्याची मागणी; मोठं आंदोलन उभं करण्याचा इशारा