Latur News : लातूर (Latur) जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील हासोरी येथे सात दिवसात चार वेळा भूगर्भातून आवाज येत आहेत. या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातारण असून गावकरी रात्र जागून काढत आहेत. सोमवारी रात्री साडे दहाच्या सुमारास भूगर्भातून जोरदार आवाज आला. दिवसभर थकून आलेले लोक झोपण्याच्या तयारीतच असताना या आवाजाने त्यांची अक्षरश: भीतीने गाळण उडाली होती. हातातल्या वस्तू जिथल्या तिथे टाकत लोकांनी घरातून बाहेर पळून जाणेच सोयीस्कर समजले आहे. 


भूगर्भातील आवाजामुळे गावकरी भीतीने घराबाहेर
मागील काही दिवसांपासून लातूरमध्ये पावसाची रिपरीप सुरु आहे. पावसाळी दिवसात घरात राहता येईना आणि बाहेर राहणं शक्य नाही अशा विचित्र परिस्थितीत लोक सध्या अडकले आहेत. मागील सात दिवसात ही चौथी वेळ आहे. भूगर्भातून खूप मोठा आवाज येत आहे, जमीन हादरत आहे. याची माहिती जिल्हा प्रशासनाला देण्यात आली होती. जिल्हा प्रशासनाच्या भूगर्भशास्त्र विभागाने स्पष्ट सांगितले आहे की हा भूकंप नव्हे तर भूगर्भातील होणाऱ्या हालचालीचा आवाज आहे. मात्र त्यावर कोणतेही नियंत्रण ठेवणे शक्य नसल्याने प्रशासन हतबल आहे. मात्र हासोरी गावातील ग्रामस्थांच्या मनातील भूकंपाची भीती काही केल्या जायचं नाव घेत नाही. रात्री साडे दहा वाजता झालेल्या घटनेमुळे संपूर्ण गाव घराबाहेर येत जागे होते.




भूगर्भातील हालचालींचा आवाज : सुरेश घोळवे, तहसीलदार, निलंगा
तीन दिवसापूर्वी निलंग्याचे तहसीलदार सुरेश घोळवे यांनी हासोरी गावाला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी भूकंप झाल्याची कोठेही नोंद झालेली नसून तीन दिवस भूगर्भातील हालचालींचा आवाज असल्याचे सांगून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र नागरिक भयभीत झाले असून हासोरीत भूकंपमापक यंत्र बसवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे.


गावकऱ्यांना 29 वर्षांपूर्वीच्या भूकंपाची आठवण
1993 साली गणेश विसर्जनानंतरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे भूकंपाचा धक्का बसला होता. यात हजारो लोकांचे प्राण गेले होते. त्यातच भूगर्भातून मोठा आवाज येत असल्याने हासोरी गावातील नागरिकांना 29 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपाची आठवण होत आहे. 30 सप्टेंबर 1993 ची पहाट महाराष्ट्र कधीच विसरु शकत नाही. गणपती विसर्जनानंतरचा दिवस. संपूर्ण महाराष्ट्र साखर झोपेत असताना लातूर जिल्ह्यातील किल्लारी आणि आजूबाजूची गावे भूकंपाने हादरुन गेली. हजारो लोक झोपेतच गाडले गेले. 6.4 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने सात हजारांपेक्षा जास्त लोकांचा बळी घेतला, 16 हजार लोक जखमी झाले. तर 52 गावांमधील 30 हजार घरे धरणीच्या पोटात गडप झाली.