लातूर : अयोध्येत (Ayodhya) होणाऱ्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेसंदर्भात संपूर्ण देशभरात उत्साह आहे. त्याच पार्श्वभूमीवर लातूरचे (Latur) खासदार सुधाकर श्रृंगारे यांच्या संकल्पनेतून श्रीरामाची (Ram Mandir) भव्य प्रतिमा साकारण्यात आलीये. तब्बल 2 लाख 30 हजार दिव्यांच्या माध्यमातून ही प्रतिमा साकारण्यात आलीये. मागील एका महिन्यापासून ही प्रतिमा साकारण्याचे काम सुरु होते. त्यासाठी लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे काम सुरु करण्यात आले. सध्या या कलाकृतीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये होण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याची माहिती देण्यात आलीये. 


कलाकार चेतन राऊत आणि त्यांच्या बरोबरच्या 100 सहकाऱ्यांनी मागील काही दिवसांपासून यासाठी काम सुरु केले होते. शुक्रवार 18 जानेवारी रोजी सकाळपासून अकरा जोडप्यांकडून होम हवन करत होते. तसेच संध्याकाळी 1100 महिलांनी आरती देखील केली. सध्या या प्रतिकृतीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी देखील मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय. 


अशी आहे प्रतिमा 


15,000 स्क्वेर फूटमध्ये भव्य-दिव्य कलाकृती साकारण्यात आलीये. या कलाकृतीसाठी 2 लाख 30 हजार पणत्यांचा वापर करण्यात आलाय. सध्या 1000 कलाकारांनी या कलाकृती काम केलंय. तसेच 5000 हायड्रोजन फुग्यांचा देखील वापर करण्यात आलाय. अहमदपूर नगरीत प्रथमच अर्धा तास भव्य आतिषबाजी करण्यात आली. 14 जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालीये. तसेच मोठ्या एलईडी स्क्रीनवर लाईव्ह स्क्रिनिंग अयोध्या मंदिराचे दाखवण्यात येणार आहे. 


लातूर जिल्ह्यातील नव्हे तर नांदेड,  परभणी,  तेलंगणा आणि कर्नाटक या भागातूनही मोठ्या प्रमाणात लोक ही प्रतिमा पाहण्यासाठी दाखल होणातायत. तसेच शुक्रवार 19 तारखेला ही प्रतिमा सर्वांसाठी खुली करण्यात आली याच ठिकाणी 22 तारखेला सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरच्या माध्यमातून पुष्पवृष्टीचे आयोजन देखील केले आहे. त्यासोबतच भव्य अशा एलईडी स्क्रीनवर अयोध्येतील प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण देखील होणार आहे. अहमदपूर नगरीमध्ये प्रथमच भव्य-दिव्य अशा अर्ध्या तासाच्या आतिषबाजीच्या नयनरम्य अशा कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आलेले आहे. 


अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी 


सध्या अयोध्येत राम मंदिर उद्घाटन सोहळ्याची तयारी सुरु आहे. त्याच पार्श्वभूमीवर जय्यत तयारी देखील करण्यात आलीये. अनेक सुरक्षा यंत्रणा देखील त्यासाठी सज्ज करण्यात आलीये. त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना हाफ डे देखील देण्याचा निर्णय घेण्यात आलाय. त्यामुळे या सोहळ्याची उत्सुकता संपूर्ण देशाला लागून राहिलीये. 


हेही वाचा : 


भिवंडीत 22 तारखेला मांस मच्छीची दुकानं बंद, आयुक्तांचे आदेश; पुण्यातही मटण, चिकन विक्री बंद, व्यावसायिकांचा निर्णय