लातूर : लातूर (Latur) शहरामध्ये फुग्यात हवा भरणाऱ्या गॅसचा स्फोट झाल्याने एकाचा मृत्यू झाला असून सात लहान मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान या लहान मुलांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये उपचार सुरु करण्यात आले आहे. लातूर शहरातील तावरजा कॉलनी भागातील हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दरम्यान यामध्ये फुगे विक्रेत्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं आहे.
नेमकं काय घडलं ?
लातूर शहरातील तारवजा कॉलनीमध्ये रविवार (15 ऑक्टोबर) संध्याकाळच्या वेळेस ही धक्कादायक घटना घडली. त्यावेळी गॅसवरचे फुगे विकणारा एक व्यक्ती त्याच्या दुचाकीसह तारवजा कॉलनीमध्ये आला होता. त्याच्यासोबत फुग्यात हवा भरणारा गॅस सिलेंडर देखील होता. फुगेवाला आल्याचं पाहून मुलांनी त्याच्या भोवती एकच घोळका केला. जवळपास सात ते आठ मुलं यावेळी तिथे हजर होती. पण अचानक त्याच्या सिलेंडरचा स्फोट झाला. मोठा आवाज झाल्याने आजूबाजूला असलेली लोकं देखील घाबरली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पण यामध्ये त्या फुगेविक्रेत्याचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्याच्या जवळ असेलेली सात ते आठ लहान मुलं देखील या स्फोटामध्ये गंभीर जखमी झाला. यामधील दोन मुलांना अतिशय गंभीर अशी इजा झाली आहे. तर इतर सात मुलं देखील तीव्र दुखापतग्रस्त आहेत. या घटनेची माहिती मिळातच विवेकानंद पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सुधाकर वावकर आणि त्यांच्या दोन पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. तर रुग्णवाहिका देखील तात्काळ हजर करण्यात आली.
जखमींवर उपचार सुरु
जखमी झालेल्या मुलांवर लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे. एकाच वेळेस आठ पेक्षा जास्त लहान मुले दवाखान्यात आल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणा देखील कामाला लागली असल्याचं सांगण्यात येत आहे. डॉक्टर शैलेंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या लहान मुलांवर उपचार सुरू आहेत. यामध्ये मृत्यू झालेला फुगेवाला हा सातत्याने लातूर शहरामध्ये गॅस वरची फुगे विकत होता. पण त्याचे नाव अजूनही समोर आले नाही.
तो आंबेजोगाई या भागातून लातूर शहरात फुगे विकण्यासाठी येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्याच्या गाडीवरुन तो विवध भागामध्ये फुगे विकत असत. या स्फोटामध्ये त्याच्या गाडीचा देखील चुराडा झाला. या स्फोटाच्या आवाजामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं. तर घटनास्थळी देखील लोकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली.