लातूर: परीक्षा आली की विद्यार्थी कधी काय करतील याचा नेम नसतो असं म्हणलं जातं. तसाच काहींचा प्रकार लातूरमध्ये समोर आलाय. लातूर जिल्ह्यातील बिंदगी हाळ येथील बारावीच्या परीक्षा सेंटरवर पेपरला जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या आणलेले पॅड खाली ठेवत त्याची पूजा केली. त्यानंतर पॅडसमोर नारळ फोडत परीक्षा केंद्रावर प्रवेश केला. आज बारावीचा (HSC Exam) पहिला पेपर इंग्रजीचा असल्याने विद्यार्थ्यांनी आपला इंग्रजीचा पेपर सोपा जावा म्हणून हा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. हे कृत्य करताना त्यांनी एक व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल (Latur Viral Video HSC Exam) केला आहे. 


लातूर विभागात 96 हजार परीक्षार्थी, 238 परीक्षा केंद्रे आहेत. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. यात लातूर विभागात असलेल्या तीन जिल्ह्यात 96 हजार 309 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. विभागात 238 परीक्षा केंद्रावर  परीक्षा होणार आहे. 


भरारी पथकाची नियुक्ती


विभागीय मंडळाने या परीक्षेची जय्यत तपारी केली आहे. परीक्षेच्या कालावधीत अनुचित प्रकार पडू नये म्हणून खबरदारी घेण्यात येत आहे. याकरिता भरारी पथकाची नियुक्तीही करण्यात आली आहे. तीनही जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल विभागाचे पथकेही कार्यरत राहणार आहेत. या परीक्षेसाठी विभागात 96 हजार 309 विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत. यात 53 हजार 309 मुले आणि 43 हजार मुलीचा समावेश आहे.


लातूर जिल्ह्यात 37 हजार 351 विद्यार्थी


परीक्षा देत असून यात 20 हजार 943 मुले व 16 हजार 408 मुलींचा समावेश आहे. धाराशीव जिल्ह्यात 16 हजार 633 विद्याथी परीक्षा देणार असून यात नऊ हजार 186 मुले व सात हजार 447 मुलींचा समावेश आहे. तर नदिड जिल्ह्यात 42 हजार 325 विद्यार्थी बारावीची परीक्षा देणार असून यात 23 हजार 180 मुले व 19 हजार 145 मुलीचा समावेश आहे, अशी माहिती त्यांनी दिली.


लातूरमध्ये 95 परीक्षा केंद्रे


विभागात या परीक्षेसाठी एकूण 238 केंद्रे आहेत. त्यात लातूर जिल्ह्यात 95, नांदेड जिल्ह्यात 101 व उस्मानाबाद जिल्ह्यात 42 परीक्षा केंद्राचा समावेश आहे. परीक्षेच्या कालावधीत दिव्यांग विद्याथ्यांची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात आली आहे.