Latur Health News: लातूर येथील विलासराव शासकीय देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील नर्सच्या सांगण्यावरून एका रूग्णास सुरक्षा रक्षकानेच इंजेक्शन दिल्याचे प्रकरण राज्यभरात खूप गाजले होते. या प्रकरणात आता नर्स आणि खाजगी सुरक्षा रक्षक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच दोघांनाही निलंबित करण्यात आल्याची माहिती आहे.
लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये (Vilasrao Deshmukh Government College Of Latur) अनागोंदी कारभाराची अक्षरशः मालिका सुरू आहे. अपघातात जखमी असलेल्या एका रुग्णाला नर्सच्या सांगण्यावरून सुरक्षारक्षकानेच औषध उपचार केल्याचा व्हिडीओ सोशल माध्यमातून व्हायरल झाला होता. या घटनेची अनेक माध्यमांनी दखल घेतली होती. वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना महाविद्यालय प्रशासनाला दिल्यानंतर महाविद्यालय प्रशासनांना तात्काळ कारवाई केली आहे. यात दोषी असलेल्या नर्स आणि सुरक्षारक्षकाला निलंबित करण्यात आले असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
शनिवारी रात्री लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील वाला या गावचे शब्बीर शेख हे अपघातात जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं होतं. तेथे आणले असता त्यांना वॉर्ड क्रमांक 27 मध्ये दाखल करण्यात आले. या वेळी त्यांना डॉक्टर तपासून गेले आणि डॉक्टरांनी नर्सला सलाईन आणि इंजेक्शन देण्याचे निर्देश दिले. मात्र नर्सने चक्क सुरक्षा रक्षकाला सलाईन आणि इंजेक्शन देण्यासाठी सांगितलं. सुरक्षा रक्षक उपचार करताना पेशंटच्या नातेवाईकांनी त्याला विरोधही केला. मात्र सुरक्षा रक्षक उपचार करतच राहिला.
यावरून सुरक्षा रक्षक आणि पेशंटचे नातेवाईक यांच्यामध्ये वाद झाला. त्यानंतर सदरील प्रकार सांगण्यासाठी पेशंटचे नातेवाईक धावत डॉक्टरांकडे गेले आणि डॉक्टरांनी येऊन नंतर उपचार करत नर्स आणि सुरक्षा रक्षक यांना फैलावर घेतलं.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. सोशल माध्यमातही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील यंत्रणेला जाग आली. आता त्यांनी चौकशी समिती नेमली आहे. सदरील प्रकार गंभीर असून या प्रकरणाची त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. तसेच तात्काळ चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगितले गेले होते. आता त्या दोघांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे
अनागोंदी कारभाराची मालिका
कॅन्सर पेशंटला चार दिवस अॅडमिट न करून घेणे, तिसऱ्या माळावरच्या रुग्णांना पाण्यासाठी पहिला माळ्यावर यावे लागणे यासह इतर अनेक प्रकार या ठिकाणी घडत आहेत. तसेच या ठिकाणचे सुरक्षा रक्षक हे उद्धट असल्याची तक्रार अनेकांनी केल्याची माहिती आहे.या ठिकाणी पेशंटच्या नातेवाईकांना सातत्याने मारहाण होत असते. आता तर सुरक्षारक्षकच नर्सच्या मार्गदर्शनाखाली उपचार करत असल्याचं दिसून येतंय. असे अनेक अनागोदी प्रकार सुरू आहेत.