लातूर : जिल्ह्यात मागील वर्षी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाला. यामुळे लातूर जिल्ह्यात पाणी संकट उभे ठाकले आहे. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 26 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यातील विविध ठिकाणी 359 विहरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रेणापूर, निलंगा, औसा व जळकोट या तालुक्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा (Water Supply) सुरु आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणी टंचाईसदृश (Water Scarcity) भागात विहीर आणि बोर यांचे अधिग्रहण केले गेले आहे. यामुळे पाणी टंचाईच्या झळा जास्त जाणवणार नाहीत, असे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे (Varsha Thakur Ghuge) यांनी सांगितले आहे. मात्र याच्या उलट जिल्ह्यातील अनेक गावात दिवस-दिवस पाण्याच्या टँकरची वाट पाहत ग्रामस्थ बसलेले पाहायला मिळत आहे.
रेणापूर तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून राज्य सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. या तालुक्यात फेब्रुवारी महिन्यापासूनच टँकर सुरुवात झाली आहे. रेनापुर तालुक्यातील पानगाव आणि अन्य पाच गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे. रेनापुर तालुक्यातील भंडारवाडी हा मध्यम प्रकल्प जवळपास आटला आहे. यामुळे या भागात दुष्काळाच्या झळा जास्त जाणवत आहेत.
ऑक्टोबरपर्यंत पाणी पुरेल, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
लातूर आणि अनेक ठिकाणी पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणात कमी पाणीसाठा आहे. मात्र ऑक्टोबरपर्यंत या ठिकाणावरून पाणीपुरवठा होऊ शकतो, अशी सद्यस्थिती आहे. पूर्वीपासूनच आपण टंचाई आराखडा तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील पाणीसाठे आणि त्याचे नियोजन करण्यात आले आहे. ज्या भागांमध्ये टंचाई आहे याची माहिती मिळाली की त्या ठिकाणी टँकर सुरुवात करण्यात आली आहे, अशी माहिती लातूरच्या जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी दिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
पाणी टंचाई! राज्यातील 909 गावं-वाड्यांवर 213 टँकरद्वारे पाणीपुरवठा; पाहा राज्यभरातील परिस्थिती?