लातूर: पाऊस पडला नाही किंवा जास्तीचा पडला तर शेतीचे नुकसान, शेती पिकली तर उत्पादन विकण्यासाठी अडचणी अशा प्रत्येक गोष्टीमुळे संकटात सापडलेला शेतकरी कसाबसा यातून सुटलाच तर प्रशासकीय अधिकारी त्याला अडचणीत आणायचे सोडत नाहीत. असाच काहीसा प्रकार लातुरात (Latur Farmer News) घडला आहे. RTO च्या जाचाला कंटाळून एका शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीनची उधळण करून आपला संताप व्यक्त केला.
शेतमाल बाजारपेठेत आणताना आरटीओ कर्मचाऱ्यांच्या (Latur RTO) अडवणुकीला शेतकरी कंटाळला आणि त्याने थेट चौकातच सोयाबीनची उधळण करत कैफियत मांडली. शेतकऱ्याने या कृतीच्या माध्यमातून कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभारावर व्यक्त नाराजी व्यक्त केली. आमदार अमित देशमुख आणि आमदार धीरज देशमुख यांना जाबही विचारला. चौकात सोयाबीन उधळत आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आपली कैफियत मांडली. शेवटी आंदोलक शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं.
आरटीओच्या जाचाने शेतकरी भरडला जातोय
आजमितीला शेतमालाला योग्य भाव मिळत नाही. सोयाबीनला भाव नसल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. त्यातच शेतमाल बाजारपेठेत घेऊन येताना आरटीओ ऑफीसमधील कर्मचारी त्रास देत असतात. गाड्या अडवून दंड मागितला जात आहे. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. या सगळ्यात शेतकरी भरडला जात आहे.
रस्त्यावर सोयाबीन टाकत संताप व्यक्त
गाड्या ओव्हरलोड असणे, पार्किंगला योग्य जागा नसणे, कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सहकार्य न मिळणे अशा प्रत्येक ठिकाणी शेतकऱ्याची आर्थिक अडवणूक आणि लुबाडणूक सुरू आहे. यात शेतकरी संपूर्णपणे कोलमडून पडत आहे. यामुळे संतप्त झालेल्या एका शेतकऱ्याने लातूर शहरातील मुख्य चौक असलेला छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गाडी थांबून सोयाबीनची बॅग भर रस्त्यावर ठेवली. यातील सोयाबीन रस्त्यावर टाकत या शेतकऱ्यांना आपला संताप व्यक्त केला.
अमित देशमुखांवरही नाराजी
आरटीओकडून होणारी अडवणूक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील मिळणारी वागणूक याबाबत संतप्त भाष्य केलं. आमदार धीरज देशमुख आणि आमदार अमित देशमुख यांचाही यावेळी उल्लेख करत कृषी उत्पन्न बाजार समितीतील कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली. कसलीही पूर्वसूचना न करता झालेल्या आंदोलनामुळे छत्रपती शिवाजी महाराज चौकात काही काळ गोंधळाची स्थिती होती. चौकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी याची माहिती पोलीस ठाण्याला दिली आणि शिवाजीनगर पोलिसांनी संतप्त शेतकरी युवकाला ताब्यात घेत वाहतूक सुरळीत केली.
लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील शेरा या गावातील माधव सोनवणे हा शेतकरी लातूर येथे सोयाबीन विक्री साठी आला होता. बाजारपेठेत गाडी घेऊन येताना आरटीओ कर्मचाऱ्यांबरोबर झालेल्या वादामुळे आणि बाजारपेठेत मिळणाऱ्या वागणुकीमुळे शेतकरी संतप्त झाला होता. त्यातून आपला आवाज प्रशासनापर्यंत जावा या उद्देशाने शेतकऱ्याने छत्रपती शिवाजी महाराज चौकात सोयाबीनची बॅग उघडत सोयाबीन उधळून देत आपला संताप व्यक्त केला आहे.
ही बातमी वाचा: