International Film Festival in Latur : विलासराव देशमुख फाऊंडेशन, पुणे फिल्म फाऊंडेशन, अभिजात फिल्म सोसायटीच्या आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आज लातुरात पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन पार पडले. सिनेमा क्षेत्रात जागतिक पातळीवर होत असलेले बदल समजून घेण्याचे भान यावे तसेच विविध देशांची संस्कृती आणि पर्यावरणाची जाणीव व्हावी, या उद्देशाने या पहिल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. 


तीन दिवसांत तब्बल 17 राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी 


मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगरनंतर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव घेण्याचा मान लातूरला मिळाला आहे. त्यामुळे लातूरकरांचा उत्साह या ठिकाणी भरभरून पाहायला मिळतोय. लातूर येथील पीव्हीआर थिएटरमध्ये तीन दिवस हा महोत्सव सुरू असणार आहे. या तीन दिवसांत लातूरकर सिनेरसिकांना 17 राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधी मिळणार आहे. 


प्रादेशिक भाषेतील चित्रपटांबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावर चित्रपट कसे निर्माण होतात? ऑस्कर आणि इतर फेस्टिव्हलमध्ये पुरस्कारासाठी निवडण्यात येणारे चित्रपटांचे विषय, त्यामागची प्रेरणा, त्याची मांडणी या सर्व बाबींची रसिकांना ओळख व्हावी, तसेच आपल्या भागातही सिने साक्षरता निर्माण व्हावी, हा या फेस्टिव्हलचा प्रमुख उद्देश आहे. तसेच, हा महोत्सव लातूरकर आणि इतर ठिकाणांहून येणाऱ्या रसिकांसाठी नि:शुल्क आहे. मात्र, त्यासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे.


उद्घाटनपर चित्रपट


रविवारी उद्घाटन समारंभानंतर स्वीडिश दिग्दर्शक तारीक सालेह यांचा 'बॉय फ्रॉम हेवन' हा चित्रपट दाखवून महोत्सवाचा प्रारंभ होईल. कान फिल्म फेस्टिवलमध्ये या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळालेला आहे. ऑस्करच्या प्राथमिक फेरीतही हा चित्रपट होता.


तीन मराठी चित्रपटांचा समावेश 


तीन दिवस चालणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये कविता दातीर आणि अमित सोनावणे दिग्दर्शित 'गिरकी', मयूर करंबळीकर दिग्दर्शित *'डायरी ऑफ विनायक पंडित'* आणि अनिल साळवे दिग्दर्शित 'ग्लोबल आडगाव' हे तीन मराठी चित्रपट दाखवले जातील. या फेस्टिव्हलमध्ये मराठी शिवाय इतर भारतीय भाषेतील तीन चित्रपट आहेत. ते पुढील प्रमाणे - 'बॅक टू फ्युचर' (डॉक्यूमेंटरी - दिग्दर्शक मनोहर बिश्त), 'द स्टार इज मूवींग' (तमिळ - दिग्दर्शक - पा. रंजित), 'सोल ऑफ सायलेन्स' (असामी - दिग्दर्शक – धनजित दास) दाखविण्यात येणार आहेत.


वर्ल्ड सिनेमा जागतिक विभागातील चित्रपटामध्ये `जागतिक विभागात (वर्ल्ड सिनेमा) 'द केस' (दिग्दर्शक- नीना गौसेवा, रशिया), 'सोन्ने'  (दिग्दर्शक- कुर्दवीन आयुब, ऑस्ट्रिया), 'लैलाज ब्रदर्स' (दिग्दर्शक- सईद रौसोई, इराण) 'द चॅनेल' (दिग्दर्शक - थाएरी बिन्श्ती, फ्रान्स, बेल्जियम), 'लायरा' (दिग्दर्शक -एलिसन मिलर,  आयर्लंड, युके) 'हबीब' (दिग्दर्शक - बेनोत मारी, बेल्जियम, फ्रान्स), 'डायव्हरटीमेंटो' (दिग्दर्शक - मारी कैसल, फ्रान्स), 'रिच्यूअल' (दिग्दर्शक - हँन्स हर्वोस, बेल्जियम, जर्मनी) 'ब्रोकर' (दिग्दर्शक- हीरोक्जू कोरीदा, दक्षिण कोरिया) हे चित्रपट दाखवले जाणार आहेत. 


'या' मान्यवरांची प्रमुख उपस्थिती 


या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी लातूरचे आमदार अमित विलासराव देशमुख, पुणे फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि ख्यातनाम दिग्दर्शक जब्बार पटेल, एफटीआयचे माजी अधिष्ठाता समर नखाते, आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.