Maharashtra Latur Crime News Updates: लातूर : काँग्रेस (Congress) पदाधिकारी खून प्रकरणाचा आज निकाल येणं अपेक्षित आहे. याप्रकरणात सहा आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून हा खटला गेली साडेनऊ वर्ष चालला आहे. एवढ्या वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा आज अखेर निकाल लागण्याची अपेक्षा आहे. याच महिन्यातील 12 तारखेला या प्रकरणाचा निकाल लागणार होता. मात्र, त्या दिवशी न्यायालयानं निकाल राखून ठेवला होता आणि सुनावणीसाठी पुढची तारीख आजची म्हणजेच, 26 सप्टेंबर देण्यात आली होती. 


21 मार्च 2014 रोजी एका काँग्रेसच्या पदाधिकारी यांचा खून झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी सहा लोकांना अटक केली होती. याप्रकरणी गेल्या नऊ वर्षांपासून एक आरोपी जेलमध्ये आहे, तर इतर सहा जण जामीनावर बाहेर आहेत. स्थानिक पोलीस ते सीबीआय अशा पाच तपास यंत्रणांनी या प्रकरणी तपास पूर्ण केला असून याप्रकरणी जवळपास हजार पानांचं दोषारोप पत्र दाखल करण्यात आलंय. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पदाधिकारी यांच्या हत्येचा मुद्दा देशभरात गाजला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक प्रचारात तंदूर से लातूर, असा उल्लेख करत या प्रकरणाची देशपातळीवर नोंद घेतली होती.


लातूर कॉंग्रेसच्या पदाधिकारी यांची हत्या मार्च 2014 मध्ये झाली होती. 2014 ची संपूर्ण निवडणूक या मुद्याभोवती फिरत होती. अशा या बहुचर्चित खून प्रकरणाचा निकाल आज लागणार आहे. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष निकालाकडे लागलं आहे. 


काँग्रेस पक्षाचे सक्रीय कार्यकर्त्या असलेल्या महिलेचा खून त्यांच्याच पक्षातील इतर सहकाऱ्यांनी केला होता. यामुळे पक्षांतर्गत राजकारण, महिला पदाधिकाऱ्यांची सुरक्षितता आणि जिल्ह्यातील काँग्रेसचं नेतृत्व या सर्व बाबींवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं. या खून प्रकरणाचा तपास अद्यापही पूर्ण झाला नसल्याची तक्रार  पिडीत महिलेच्या कुटुंब सातत्यानं करत असतात. 2014 च्या निवडणुकीत हे प्रकरण अतिशय गाजलं होतं. काँग्रेस आणि काँग्रेसची ध्येयधोरण, महिलांचं काँग्रेसमधील स्थान याचं मूल्यमापन या प्रकरणावरून विरोधी पक्षांनी सातत्यानं टीका करत हा निवडणुकीचा मुद्दा केला होता


कोण होत्या कल्पना गिरी?


पिडीत महिला या पक्षाच्या महत्वाच्या पदावर होत्या. 28 वर्षीय पीडिता सात वर्षांपासून सामाजिक कामांमध्ये सक्रीय होत्या. युवक कॉंग्रेसमध्ये आल्यानंतर अल्पावधीतच त्या लातूर शहर विधानसभा युवक कॉंग्रेस सरचिटणीस म्हणून निवडून आल्या होत्या. त्यांनी एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं होतं आणि त्या लवकरच वकिल म्हणून प्रॅक्टिस सुरू करणार होत्या. याव्यतिरिक्त त्या एमपीएससी आणि इतर स्पर्धा परीक्षा देण्याच्या तयारीत होत्या. तरुण आणि होतकरू असलेल्या पिडीतेला पक्षातून मोठा विरोध होता. यामुळे त्याचा घात झाल्याचा आरोप कुटुंबियांनी केला होता. 


काय घडलं होतं त्या दिवशी? 


पिडीत महिलेचा मृतदेह तुळजापूर जवळच्या तलावात आढळून आला होता. अपहरण आणि बलात्कारानंतर त्यांचा खून करण्यात आला असल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला होता. याशिवाय त्यांच्या मृत्यूमागे युवक कॉंग्रेसचेच पदाधिकारी असल्याचंही तिच्या वडिलांनी माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर पोलिसांनी मोठ्या प्रमाणात तपासाची सूत्रं हलवली. पिडीत महिलेच्या मारेकऱ्यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी लातूरचं वातावरण चांगलंच तापलं होतं. पोलिसांनी यात महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली होती. यापैकी महेंद्रसिंह चौहान हा युवक कॉंग्रेसचा शहर अध्यक्ष आहे, तर समीर किल्लारीकर सदस्य आहे. समीर किल्लारीकर यानं कबुली जबाब दिला आहे की, महेंद्रसिंह चौहान आणि पिडीत महिला यांच्यात त्या दिवशी वाद झाला होता. महेंद्रसिंह चौहान याचं फटकून वागणं पिडीत महिलेला आवडत नव्हतं. तुळजापूर जवळील तलावात ढकलून आरोपीनं त्यांचा खून केला होता. महिलेने युवक कॉंग्रेसची निवडणूक लढवू नये, असा आरोपींचा आग्रह होता. मात्र तिनं या निवडणुकीत सहभाग घेतल्यानं त्यांना युवक कॉंग्रेसचे हे पदाधिकारी जागोजागी अपमानित करत होते. युवक कॉंग्रेसवर मयत महिलेच्या वडिलांना आधीपासूनच संशय होता आणि अखेर वडिलांचा संशय खरा ठरला. 


राजकारणातली जीवघेणी चढाओढ आता युवक कार्यकर्त्यांमध्येही होताना स्पष्ट दिसत आहे. अशा परीस्थित राजकीय पक्षातील महिला युवतींची अशी दशा होत असेल, तर सर्वसाधारण महिलांच्या सुरक्षेचं काय? असा प्रश्न या घटनेनं समाजाच्या मानगुटीवर कायम राहिला आहे. 


 हत्याकांडाचा घटनाक्रम 



  • 21 मार्च 2014 रोजी महिला बेपत्ता झाली.

  • 24 मार्चला मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरजवळ पाचुंदा तलावात सापडला.

  • 24 तारखेलाच रात्री उशिरा मृतदेह लातुरात आणण्यात आला आणि लगेचंच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • 26 मार्च रोजी महिलेचा भावाने बलात्कार करून खून करण्यात आल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली.

  • 28 तारखेला संध्याकाळी पोलिसांनी हत्येप्रकरणी युवक कॉंग्रेसचा अध्यक्ष महेंद्रसिंह चौहान आणि समीर किल्लारीकर या दोघांना अटक केली आहे.

  • 13 एप्रिल रोजी या प्रकरणातील तिसरा संशयित आरोपी श्रीरंग ठाकूर याला पोलिसांनी अटक केली.

  • 15 एप्रिल रोजी चौथा संशयित आरोपी म्हणून प्रभाकर शेट्टी या हॉटेल व्यावसायिकाला पोलिसांनी अटक केली.

  • शेट्टीला 5 दिवसांची प्रथम पोलीस कोठडी सुनावल्यानंतर 14 दिवसांची न्यायालईन कोठडी सुनावण्यात आली होती.

  • त्यानंतर काही दिवसांनी या प्रकरणात काही जणांना अटक करण्यात आली होती.