लातूर : देशातील सर्वोच्च अशी सुरक्षा भेदून संसदेच्या परिसरात आणि लोकसभेमध्ये चार तरूण घुसले आणि एकच गोंधळ सुरू झाला. भारत माता की जय, तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा देत त्यांनी गोंधळ घातला हे अवघ्या देशाने पाहिले. या प्रकरणात आता एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्यामध्ये लातूरच्या अमोल शिंदे (Amol Shinde) नावाच्या युवकाचा समावेश आहे. 


मिल्ट्री भरतीमध्ये सहा वेळा अपयशी आलेल्या या युवकाला नैराशेने ग्रासले, त्याच्यासारख्याच बेरोजगार तरूणांनी एकत्र येऊन हा गोंधळ घातल्याचं आता स्पष्ट झालं. या सर्व तरूणांना एकत्र जोडणारा एक दुवा आहे आणि तो म्हणजे भगतसिंह. अटक करण्यात आलेल्या सर्व तरूणांना भगतसिंह या फेसबुक पेजने एकत्र आणले.


दिवसभर मजुरी केली अन् त्या पैशातून भगतसिंहांचा फोटो आणला


दिवसभर पाठीवर फवारा घेऊन एका शेतात फवारणी केली अन् त्यातून मिळालेल्या पैशातून अमोल शिंदेने लातूर गाठले आणि त्या ठिकाणाहून भगतसिंहांचा एक फोटो आणला. घर लहान असल्याने या फोटोला धुरळाही लागू नये म्हणून जीवापाड जपला. भगतसिंहांच्या सोबत राजगुरू आणि सुखदेव यांचेही फोटो त्याने आणल्याचं पालकांनी सांगितलं. 


टीव्हीवर आपल्या मुलाला पाहिलं आणि पालकांच्या काळजाचं पाणीपाणी झालं. दिवसभर रोजंदारी करणारा, काबाडकष्ट करणारा आपला पोरगा, मिल्ट्री भरतीसाठी सहावेळा अपयश आल्यानंतर नैराश्य आलेला आपला पोरगा, पोलीस भरतीसाठी दिवसभर पळणारा आपला पोरगा या अशा अवस्थेत सापडल्याचं टीव्हीवर दिसलं आणि त्याच्या अशिक्षीत पालकांच्या पायाखालची जमीनच हादरली. 


सहावेळा पोलीस भरतीमध्ये अपयश


पोलीस आणि मिल्ट्री भरतीची आस असलेल्या तरुण, मागील अनेक वर्षापासून तो नोकरीसाठी प्रयत्न करीत होता पण हाती निराशा आलेली. देशातील अनेक ठिकाणी जात अमोलने भरतीसाठी प्रयत्न केले. मात्र हाती काही लागले नाही. त्याने काय केले हे पोलीस आल्यावर कळाले. आमचं पोरग फक्त पोलीस आणि मिल्ट्री भरतीच स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करत होतं, त्याने कोणतंही देशविघातक कृत्य केलं नाही, त्याला सोडावं अशी मागणी करत अमोलची आई ओक्साबोक्सी रडत होती. पोराशी बोलणं नाही करून दिलं तर आपण आत्महत्या करू असा इशारा देणारे अमोलचे वडील धनराज यांच्या डोळ्यातही आसवं दाटली होती आणि त्यांना पुढे काय होणार याची चिंता लागली होती. 


देशविघातक कृत्य केलं नाही, पालकांच्या डोळ्यात पाणी


अनेक प्रयत्न करूनही नोकरी नाही, त्याचवेळी भगतसिंहांच्या विचारांशी ओळख झाल्याने डोक्यात क्रांतीकारक विचार अशी काहीशी स्थिती अमोलची झाली. भगतसिंहाप्रमाणे काहीतरी वेगळं केलं तर आपल्याकडे लक्ष वेधलं जाईल, आपल्या बेरोजगारावर काहीतरी मार्ग निघेल असं अमोल शिंदेला वाटलं असावं कदाचित. अमोलला कुठलंही व्यसन नाही, तो दिवसभर रोजंदारीचं काम करायचा, दिवसभर पळायचा. आपल्या पोरानं कोणतंही देशविघातक कृत्य केलं नाही असं त्याच्या पालकांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


वंचितचे प्रकाश आंबेडकरांनी या मुलांची शिक्षा माफ करावी अशी मागणी सरकारकडे केली आहे. देशाच्या संसदेची सुरक्षा भेदून आत प्रवेश करणे हे चुकीचंच असलं तरीही त्यामागची भावना लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. 


ही बातमी वाचा: