नागपूर : पावसाळ्याचे दिवस आहेत. शासनाने तीन दिवस ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. अशा वातावरणात दुषित पाणी आणि अन्य इतर बाबींमुळे अनेक रोंगाचा प्रादुर्भाव होण्याचा धोका असतो. डेंग्यु हा विषाणूमुळे होणारा आजार असून डॉक्टरांचा सल्ला घ्या. योग्य उपचार योग्य वेळीच घ्या, उपाशी पोटी औषधोपचार घेऊ नका, मांत्रिक व भोंदु वैद्याचा सल्ला घेवू नका, डेंग्यु आजाराबाबत जनेतेने घाबरुन जावू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी आर. विमला यांनी केले आहे.
जनतेच्या सहकार्याशिवाय किटकजन्य आजाराचे नियंत्रण करणे शक्य नाही, डेंग्यु आजाराबाबत जनेतेन घाबरुन न जाता त्वरीत नजिकच्या उपचार केंद्राशी सपंर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनीही केले आहे. डेंग्यु ताप डेंगी विषाणूमुळे होणारा आजार असून त्याचा प्रसार एडिस इजिप्टाय डासामार्फत होतो. या आजाराचा लक्षणानुसार ठराविक उपचार उपलब्ध नाही. या आजाराची लक्षणे डोके दुखी, ताप, थकवा, अतिशय जास्त्, सांधेदुखी, अंगदुखी, ग्रंथीची सुज, अंगावर पुरळ, पोटदुखी आदी प्रतिबंधाकरीता कोणतेही लस किंवा औषध उपलब्ध नाही. डेंगी रक्तस्त्रावी ताप जास्त गंभीर आजारआहे.
डेंग्युचे डास दिवसाच शरीराला चावतात. घरातच तयार होणारा व घरातच अंधाऱ्या, थंड ओलाव्याच्या जागी, पलंगाखाली, पडद्याच्या मागे, बाथरुममध्ये आढळतात. जनतेने घरातील पाण्यात डास तयार होणार नाही याची दक्षता घ्यावी. पाण्याची टाकी, फुलदाणी, पक्षांचे पिण्याचे पाण्याचे भांडे, फ्रिजचा ट्रे, नारळाच्या करवंटया, तुटलेलेव फुटलेले भांडे व टायर आदी स्वच्छ करावे. या तापामुळे प्लेटलेटचे प्रमाण झपाटयाने कमी होते. गर्भवती स्त्रिया, मधुमेही व लहान मुले यांना डेंग्यु ताप होण्याची शक्यता जास्त असते. त्यांची प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे. डेंग्यु तापाविषयी जनतेमध्ये गैरसमज व भिती आढळून येते. सद्या डेंग्यु तापाचा पारेषण काळ सुरु झालेला आहे. त्यामुळे उपचारापेक्षा प्रतिबंध जास्त आवश्यक आहे. लोक सहभागाने डेंग्यु तापावर नियंत्रण शक्य आहे.
गेल्यावर्षी 1 हजार 254 डेंगी दुषित, 6 जणांचा मृत्यु
मागील वर्षी नागपूर ग्रामीण भागातील 312 गावे व 5 नगरपरिषद भागात 4 हजार 333 रक्तजल नमुने तपासले त्यामध्ये 1 हजार 254 डेंगी दुषित आढळले व 6 मृत्यु होते. यावर्षी जानेवारी पासून 98 रक्तजल नमुने तपासले व त्यात 10 डेंगी दुषित आढळून आले. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून घर व परिसर स्वच्छ ठेवावे. कुठेही पाणी जास्त दिवस साचू देवू नये. आरोग्य विभागातर्फे जिल्ह्यात शासकीय मेडीकल कॉलेज, इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, स्व. प्रभाकर दटके रुग्णालय येथे डेंग्यु तापाबाबत तपासणी व उपचार करण्यात येत आहे.
डेंग्यु तापाची लक्षणे
एकाएकी तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायुदुखी, सांधेदुखी, उलटया होणे, अशक्तपणा, भूक मंदावणे, जास्त तहान लागणे, तोंडाला कोरड पडणे, तापामध्ये चढउतार होणे, अंगावर पुरळ येणे, त्वचेखाली रक्तस्त्राव होणे, रक्तमिश्रीत किंवा काळसर शौचास होणे व पोट दुखणे आदी लक्षणे आहेत.
प्रतिबंधात्मक उपाययोजना
पूर्ण बाह्याचे कपडे व संपूर्ण अंग झाकणारे कपडे वापरावेत. कुलमधील पाणी आठवडयातून एकदा रिकामे करावे. आवश्यकता नसल्यास कुलर काढून ठेवावेत. घरातील वापरीचे पाणी साठे भांडे एकदा घासून पुसून कोरडे करावेत. वापरीचे पाणी साठे झाकून ठेवावेत. निरुपयोगी वस्तु जसे टायर्स,प्लास्टिक कप, बाटल्या, प्लॉटिक पिशव्या आदी वेळीच विल्हेवाट लावण्यात यावी व त्या नष्ट कराव्यात. ग्रामपंचायत किंवा नगरपरिषदेच्या माध्यमातून नाल्या वाहत्या ठेवाव्या. आठवडयातून एक दिवस कोरडा दिवस पाठावा. गांव व शहराची साफसफाई करण्यात यावी. ताप कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्लानुसार पॅरासिटामॉल् गोळया घ्याव्या. स्वत: एस्प्रिन व इब्रुफेनचा वापर करु नये.