बीड : पपई हे नाजूक फळ असल्याने अनेक शेतकरी हे पीक घेण्यास धजावत नाहीत. मात्र बीडमधील एका शेतकऱ्यानं पपईच्या पिकातून तब्बल लाखोंचं उत्पादन घेतलं आहे. माजलगावच्या निमगावचे प्रयोगशील शेतकरी विकास गायकवाड यांनी दीड एकर पपईतून साडेचार लाखाच्या फळाची विक्री केली.


माजलगाव तालुक्यातल्या हरके निमगावच्या विकास गायकवाड यांनी नोव्हेंबर 2016 मध्ये आपल्या दीड एकरावर तैवान जातीच्या पपईची लागवड केली. या दीड एकरामध्ये पंधराशे पपईची झाडं आहेत. दहा रुपये प्रतीरोपाप्रमाणे त्यांना लागवडीसाठी पंधरा हजार रुपये खर्च आला. तर खत आणि इतर मशागतीसाठी वीस हजार रुपये एवढा खर्च झाला. आता या पपईची विक्री अकरा रुपये/किलो प्रमाणे नागपूरला करण्यात येत आहे.

विकास गायकवाड यांचं पूर्ण कुटुंब या शेतामध्ये राबतं. पपईसोबतच त्यांनी आपल्या पावणे दोन एकर शेतीमध्ये झेंडूची लागवड केली.  फळबाग शेतीतून त्यांना सध्या चांगला फायदा होत असल्याने त्यांनी फुल शेतीदेखील करायला सुरुवात केली आहे. आतापर्यंत एक लाख रुपयाच्या पपईची विक्री करण्यात आली असून आणखी या पपईतून त्यांना साडेतीन लाख रुपयाची अपेक्षा आहे, तर झेंडूच्या फुलाला जर चांगला दर मिळाला तर यातून पाच ते सहा लाखाच उत्पन्न त्यांना मिळणार आहे.

पपईची लागवड केल्यानंतर त्यांनी यात आंतरपीकंदेखील घेतली आहेत. त्यातूनही त्यांना चांगल उत्पन्न मिळत आहे. अनेक शेतकरी पपईच्या बागा लावतात, मात्र योग्य नियोजन न केल्याने मोठ्या प्रमाणात फळाची गळ होते. मात्र गायकवाड यांनी आधुनिक शेतीचा मार्ग अवलंबल्याने त्यांनी या समस्यांवर मात केली आहे.

बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात डाळिंब आणि मोसंबीची लागवड केली जाते. त्याचबरोबर आता शेतकरी पपई आणि फुल शेतीकडे वळत आहेत. मुबलक पाण्यावर येणाऱ्या या फळबागेतून एकरी चार ते पाच लाखांचं उत्पन्न घेता येत. माजलगाव परिसरात आता धरणाच्या पाण्यावर शेतकरी मोठ्या प्रमाणात आधुनिक शेती करून लाखोंचं उत्पन्न घेत आहेत.