कोल्हापूर : राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना पाणी मीटर बसवले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी दिला. 


महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशनकडून सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वाढीव पाणीपट्टी विरोधात पुणे बंगळूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देत सरकारने याबाबत 6 जून रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन 6 तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.  






राजू शेट्टी म्हणाले की, एकीकडे सरकारने शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत. दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दहापट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफआरपीमध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे. 


कोल्हापूरकर आंदोलनात कमी पडणार नाहीत


दरम्यान, आमदार सतेज पाटील म्हणाले की, अगोदरच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी जादा दराने पाणीपट्टी आकारून वसुली करणाऱ्या नफेखोर सरकारने आंदोलकांच्या न्याय्य मागण्या तातडीने मान्य केल्या पाहिजेत. अन्यथा 6 जून नंतर कोल्हापूरकर आंदोलनात कमी पडणार नाहीत.


यावेळी माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज पाटील यांच्यासह आमदार अरूण लाड, माजी आमदार संजयबाबा घाटगे, राजारामबापू कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयंत पाटील याप्रसंगी उपस्थित होते.  या आंदोलनात डॉ. भारत पाटणकर, विक्रांत पाटील-किणीकर, चंद्रकांत पाटील, जे.पी. लाड, आर.जी. तांबे यांच्यासह कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्हयातील शेतकरी, सहकारी पाणी पुरवठा संस्थांचे सभासद मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


इतर महत्वाच्या बातम्या