Kolhapur News : राज्य सरकारने 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यास न्यायालयीन लढा देण्याचा इशारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने दिला आहे. कोल्हापुरातील कार्यकर्त्यांनी सुद्धा आंदोलनाचा इशारा दिला आहे. 


20 पेक्षा कमी पट असलेल्या शाळांची माहिती संकलन करून सदर शाळा जवळच्या शाळेत समायोजीत करण्याचा शासन स्तरावरून चालेला प्रयत्न वाडीवस्तीवरील विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक असून शासनाने सदर शाळा पट संख्येअभावी बंद करू नयेत, अन्यथा संघटनेच्या वतीने न्यायालयीन लढा देण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांना मेलमधून दिला आहे. निवेदनाची प्रत राज्याचे शिक्षण सचिव, शिक्षण आयुक्त व शिक्षण संचालक यांनाही पाठवण्यात आली आहे.


पुरोगामी शिक्षक संघटनेचे अध्यक्ष प्रसाद पाटील यांनी म्हटले आहे की, 20 पेक्षा कमी पटाच्या बहुतांश शाळा ग्रामीण व डोंगराळ भागात आहेत. वाडीवस्तीवर जन्म होणे हा त्या बालकाचा दोष नसून तेथील शाळा पटसंख्या अभावी बंद करणे हा त्या विद्याथ्यांवर अन्याय होईल. सदर शाळा बंद करण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन लढा देणार आहोत. 


शाळा बंद झाल्यास तेथील मुले पुन्हा शिक्षणापासून वंचित राहतील


निवेदनात पुढे म्हटले आहे की, वाडीवस्तीवरील बालक शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून शासनाने वस्ती तेथे शाळा सुरु केल्या आहेत. त्यामुळे शिक्षणापासून वंचित राहणारी तेथील मुले व मुली शिक्षण प्रवाहात आली आहेत. बालकाचा शिक्षणाचा मोफत व सक्तीचा अधिकार कायदा 2009 नुसार राज्यातील 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकाला त्याच्या इच्छेनुसार मोफत प्राथमिक शिक्षण देण्याची जबाबदारी शासनाची आहे. बालकाच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यानुसार 1 किमीपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या वाडीवस्तीवरील शाळा पट संख्या कमी आहे म्हणून बंद करता येणार नाहीत. शाळा बंद झाल्यास तेथील मुले पुन्हा शिक्षणापासून वंचित राहतील.


दुसरीकडे 2018 मध्ये तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला होता. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात 50 हून अधिक शाळा आहेत, ज्यात बहुतांशी चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज या जिल्ह्यांच्या दुर्गम, डोंगराळ भागात आहेत. या विद्यार्थ्यांचे पालक जंगल परिसरात राहतात आणि त्यांना त्यांच्या मुलांसाठी दुर्गम भागातील शाळा सोयीस्कर आणि सुरक्षित वाटतात. 


इतर महत्वाच्या बातम्या