Uddhav Thackeray : एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला अभूतपूर्व खिंडार पाडल्यानंतर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे पुन्हा एकदा शिवसैनिकांमध्ये जोश निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांच्यानंतर आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेही महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अर्थातच त्यांच्या दौऱ्याची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातून करणार आहेत, तर या दौऱ्याची सांगता कोल्हापूरच्या बिंदू चौकात होणार आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव पार पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांची महाप्रबोधन यात्रा सुरु होणार आहे. त्यांची पहिली सभा शिवसेनेला पहिल्यांदा सत्तेची चव चाखायला देणाऱ्या ठाण्यातील टेंभी नाक्यावर होणार आहे. त्यानंतर महाराष्ट्र पिंजून काढत शेवट कोल्हापूरमध्ये होईल.
उद्धव ठाकरेंची सांगता कोल्हापुरात, पण बाळासाहेब प्रचाराचा नारळ बिंदू चौकात फोडत असत
कोल्हापूर आणि बिंदू चौक ऐतिहासिक समीकरण आहे. या बिंदू चौकाने राज्यातील अनेक रथी महारथींच्या सभा गाजवल्या आहेत. यामध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा केला जातो. बाळासाहेब आणि कोल्हापूरचा ऋणानुबंध नेहमीच वेगळा राहिला आहे. बाळसाहेब आपल्या प्रचाराचा नारळ बिंदू चौकातच फोडत होते. त्यामुळे कोल्हापूरकरांनी सुद्धा बाळासाहेबांना भरभरून प्रेम दिलं. त्यामुळे कोल्हापूरच्या मातीतील दोन्ही खासदार शिवसेनेचे असावेत असे त्यांना नेहमी वाटत असे. त्यांचे स्वप्न 2019 मध्ये पूर्ण झाले होते.
मात्र, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर कोल्हापूरला ठाणे आणि औरंगाबादनंतर अभूतपूर्व खिंडार पडले आहे. कोल्हापूर एकमेव शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर, सहयोगी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने यांनी शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शिवसेना वाढवण्याचे काम पदाधिकारी आणि निष्ठावंत शिवसैनिकांवर आहे.
आदित्य ठाकरेंच्या कोल्हापूर दौऱ्याला अभूतपूर्व प्रतिसाद
एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर गेल्या दीड महिन्यांपासून आदित्य ठाकरे महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. त्यांची निष्ठा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोल्हापूरमध्ये पोहोचली. त्यांचे आजरा तालुक्यात झालेले स्वागत बंडखोर प्रकाश आबिटकर आणि संजय मंडलिक यांच्या पोटात गोळा आणणारे होते. त्यानंतर कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटी आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापूर ते जयसिंगपूर जातानाही त्यांना मिळालेला प्रतिसाद बंडखोरांना विचार करायला भाग पाडणारे होते. त्यामुळे तीच उर्जा टिकवून ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरे यांच्यासमोर असेल.
या दौऱ्यातून आगामी लोकसभेसाठी बंडखोरांविरोधात काही संकेत देणार का? याचीही उत्सुकता नक्कीच असणार आहे. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या प्रतिसादानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे खासदारांसह अंबाबाईच्या दर्शनाला आले होते. मात्र, 40 आमदारांपाठोपाठ 12 खासदारांनी केलेल्या बंडानंतर नव्याने पक्षबांधणीचे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
महाविकास आघाडीचा प्रयोग पहिल्यांदाच कोल्हापूरमध्येच
राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग राज्य पातळीवर 2019 मध्ये झाला असला, तरी त्याचा पहिला प्रयोग कोल्हापूरमध्येच झाला होता. महापालिकेत भाजपला दूर ठेवण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून महाविकास आघाडी करण्यात आली होती. मात्र, आता राजेश क्षीरसागर शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. त्यामुळे मनपा निवडणुकीसह, सहा नगरपालिका तसेच स्थानिक संस्थांच्या निवडणुकीसाठी काही बोलणी करतात का? हे पाहणे सुद्धा औत्सुक्याचे असेल.
इतर महत्वाच्या बातम्या