Radhakrishna Vikhe Patil : महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज वारणा उद्योग समूहास भेट देऊन पाहणी केली. आमदार विनय कोरे यांनी त्यांचे वारणा उद्योग समूहाच्या वतीने स्वागत केले.
यावेळी खासदार धनंजय महाडिक, आमदार विनय कोरे, आमदार राहुल कुल, जिल्हाधिकारी राहुल रेखावार,उपविभागीय अधिकारी अमित माळी, तहसिलदार रमेश शेडगे, प्रादेशिक दुग्ध विकास अधिकारी पी.पी. मोहोड, जिल्हा दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
विखे पाटील यांनी वारणा उद्योग समूहातील प्रोसेस विभाग, पॅकिंग विभाग, मेकिंग विभाग आणि माल्टेड फूड डिव्हीजन या विभागाना भेट देऊन माहिती घेतली आणि सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या परिश्रमातून उभा राहिलेल्या या उद्योग समूहास त्यांनी शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी, विखे पाटील यांनी सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या समाधीवर पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.
जोतिबा व अंबाबाईचे घेतले दर्शन
राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे जोतिबाचे आणि कोल्हापूर येथे करवीर निवासनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? कधीकाळी काँग्रेसी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांचा थेट वार!
तत्पूर्वी, राधाकृष्ण विखे पाटील कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? असा सवाल करत कधीकाळी काँग्रेसी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट वार केला. राज्य अधोगतीला जात होतं, आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिलं आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिलं आहे. यावेळी त्यांनी वाळू माफियांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.