Kolhapur News: कोल्हापुरातील शिवसेनेची आजवरची परंपरा पाहता कोणताही उसना उमेदवार आगामी लोकसभेसाठी न देता निष्ठावंत आणि प्रामाणिक शिवसैनिकाला संधी द्यावी, असाच सूर पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात आळवण्यात आला. यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी पक्ष बांधणीचे आवाहन केले. धोका दिलेल्यांचा बदला घ्यायचा असून पक्ष तळागाळात पोहोचवा. पक्ष बांधणीचे काम मजबूत करा, असे आवाहन त्यांनी केले. जुलैच्या पंधरवड्यानंतर उद्धव ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमी पक्षाच्या माजी आमदारांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी लोकसभेला शिवसैनिकाला संधी देण्याचे आवाहन केले. 


कोल्हापुरात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी जिल्ह्यातील पद माजी आमदार, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष आणि पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी थेट कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून तर जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मागितली. कोल्हापुरातील दोन्ही खासदार शिंदे गटात आहेत. 


शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे


संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, लोकसभेसाठी उमेदवारी मागताना आपल्या पायाखाली किती थर मजबूत आहेत, हेसुद्धा पाहिलं पाहिजे. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद अशा अनेक ठिकाणी पोहोचले पाहिजे. पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर न मांडता ते 'मातोश्री'च्या दारात सोडवले गेले पाहिजेत. माजी आमदार उल्हास पाटील म्हणाले की, मतदार संधीची वाट पाहत आहेत. स्वाभिमानाने जनतेसमोर जायचे आहे. सच्चा शिवसैनिकांनाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा संदेश मातोश्रीवर देण्यात यावा. माजी आमदार सत्यजित पाटील यांनी लोकसभेसाठी जो उमेदवार द्याल, त्याला शाहूवाडी, आंबा परिसरातून मताधिक्य देऊ, अशी ग्वाही दिली. माजी आमदार सुजित मिणचेकर यांनी सुरुवातीला शिवसेना फोडली, आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडली. भाजपची ही रणनीती मतदारांसमोर आणली पाहिजे, असे आवाहन केले. 


जिल्हा मुरलीधर जाधव म्हणाल, काहीजण निवडणुकीवेळी पक्षात येऊन खासदार झाले. आता हे चालणार नाही. आता उसना उमेदवार खपवून घेणार नाही. विजय देवणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी कधी खुर्चीसाठी राजकारण केले नाही. ज्यावेळी मी लोकसभा लढविली तेव्हा आपल्याकडे एकही आमदार नव्हता. फक्त संजय पवार बरोबर होते. आताची परिस्थिती वेगळी आहे. आता उसना उमेदवार नको. एकेकाळी सहा आमदार, दोन खासदार शिवसेनेचे होते. ते पुन्हा आणायचे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या :