Uday Samant : कोल्हापूर जिल्ह्यात पुणे-बंगळूर महामार्गावर विकासवाडी (MIDC at Vikaswadi on Pune Bangalore highway) येथे नवी एमआयडीसी सुरू करण्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. राज्यात उद्योगांना चालना देण्यासाठी औद्योगिक वसाहतींना आवश्यक त्या सर्व सुविधा गतीने उपलब्ध करुन देण्यात येतील, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सामंत यांनी केले. ज्याचा वापर केला जात नाही, असे भूखंड काढून घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळ व उद्योग विभागाची कोल्हापूर जिल्हा आढावा बैठक तसेच उद्योग क्षेत्राच्या समस्यांबाबत कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील विविध औद्योगिक संघटनांच्या प्रतिनिधींसोबत उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली, यावेळी ते बोलत होते. 


बैठकीला राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राहुल भिंगारे, अधीक्षक अभियंता राजेंद्र गावडे, कार्यकारी अभियंता अतुल ढोरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सतीश शेळके, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी, सत्यजित चंद्रकांत जाधव तसेच औद्योगिक संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.


मंत्री सामंत म्हणाले, विकासवाडीत 70 हेक्टर जमीन शासकीय आहे. ती महिन्याभरात ताब्यात घेण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांना दिले आहेत. उर्वरित 200 हेक्टर जमिनीबाबत संबंधित शेतकर्‍यांचा गैरसमज दूर करून लवकरच भूसंपादनाची कार्यवाही सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या एमआयडीसीमधील ताब्यात घेतल्या जाणार्‍या 70 हेक्टरपैकी 20 हेक्टर जागा लघू उद्योजकांना तातडीने उपलब्ध करून दिली जाणार आहे.


पायाभूत सुविधांसाठी 14 कोटींचा निधी


लक्ष्मी-पार्वती औद्योगिक वसाहतींच्या पायाभूत सुविधांसाठी 14 कोटींचा निधी मंजूर केल्याचे सांगत सामंत म्हणाले, जिल्ह्यातील तिन्ही एमआयडीसींमधील रस्ते तसेच पंपिंग स्टेशनमधील यंत्रसामग्री खरेदीसाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. एमआयडीसींमधील पोलिस ठाण्यांच्या इमारती बांधून दिल्या जातील तसेच या पोलिस ठाण्यांना आवश्यक वाहने जिल्हा नियोजन समितीमधून उपलब्ध करून दिली जातील. प्रोत्साहन योजना तसेच पर्यावरण शुल्क याबाबतही निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.


65 एकर जागेतील भूखंड काढून घेतले जातील


उद्योगासाठी भूखंड घेऊन बाजारभावाची किंमत वाढण्याची जे वाट बघताहेत, भूखंड वापराविना तसाच ठेवलाय, असे भूखंड काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे 65 एकर जागेतील भूखंड काढून घेतले जातील, असेही सामंत यांनी सांगितले.


नविन एमआयडीसीमध्ये स्थानिक आणि लघु उद्योगांना प्राधान्य द्यावे, राज्यभरात ग्रामपंचायतीना एकसमान आणि कमीत कमी दर असावा, उद्योजकांसाठी महाराष्ट्रातील पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्ह या सामायिक प्रोत्साहन योजना 13 प्रमाणे सुधारित कराव्यात, या मागण्यांबाबत मंत्री उदय सामंत यांनी औद्योगिक संघटनांसोबत चर्चा केली. गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील वसाहतीत प्रवेश करणाऱ्या मुख्य चौपदरी रस्त्याचे डांबरीकरण करणे, उद्योग वाढीसाठी गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीतील उद्योजकांना जागा उपलब्ध करून देणे, या  वसाहतीमध्ये फायर स्टेशनची सुविधा उपलब्ध करुन देण्याबाबत चर्चा झाली.


इतर महत्वाच्या बातम्या