Sukhoi-30 and Mirage 2000 Crashed in Madhya Pradesh : नेहमीच्या प्रशिक्षण सरावासाठी मिराज  आणि सुखोई या दोन विमानांनी उड्डाण केले होते. काही वेळातच दोन्ही विमानांची धडक झाली आणि त्यात दोन वैमानिक बचावले आणि एका वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. भारतीय हवाई दलाच्या दोन विमानांचा भीषण अपघात झाला आहे. यात बेळगावचे रहिवासी वैमानिक हणमंतराव रेवणसिद्दप्पा सारती यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य दोन पायलट गंभीर जखमी झाले आहेत. हवाई दलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.


भारतीय हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, मध्यप्रदेशमधील मोरेना येथे शनिवारी सकाळच्या सुमारास सुखोई-30 आणि मिराज 2000 ही दोन विमानं कोसळली. दोन्ही विमानांनी ग्वाल्हेर येथील हवाई तळावरून उड्डाण केलं होतं. अपघातावेळी सुखोई-30 (Sukhoi-30) मध्ये 2 वैमानिक आणि मिराज 2000 (Mirage 2000) मध्ये एक वैमानिक होता. यातील मिराजमधील वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. तर सुखोई-30 मधील दोन्ही वैमानिक गंभीर जखमी आहेत. दरम्यान, सुखोई-30 आणि मिराज 2000 (Mirage 2000) यांची हवेतच धडक झाल्याचं सांगितलं जात आहे. याबाबत हवाई दलाकडून चौकशी करण्यात येणार असल्याचं समोर आलं आहे. तसेच या अपघाताची संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, सीडीएस अनिल चौहान यांनी हवाई दलाचे प्रमुख व्ही. आर. चौधरी यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. दरम्यान, हवाई दलाच्या दोन विमानांच्या टक्करीत बेळगावच्या पायलटचा मृत्यू झाला आहे. बेळगावातील गणेशपूर येथील हणमंतराव रेवणसिद्द्पा सारती असे त्यांचे नाव आहे.


त्यांच्या कुटुंबाला लष्करी सेवेची पार्श्वभूमी आहे. त्यांचे वडील रेवणसिद्द्पा सारती हे आर्मीमध्ये सेवा बजावून कॅप्टन पदावरून निवृत्त झाले आहेत. तर त्यांचा एक भाऊ रवी हेसुद्धा हवाई दलात वैमानिक म्हणून सेवा बजावत आहेत. हणमंतराव यांचे पोस्टिंग सध्या मध्यप्रदेशमधील ग्वाल्हेर येथे होते. दैनंदिन सरावासाठी त्यांनी ग्वाल्हेर येथून उड्डाण केले होते. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या विमानाची आणि अन्य एका विमानाची हवेत धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत त्यांना वीरमरण आले. त्यांच्या मागे आईवडील, पत्नी, 2 मुले, भाऊ आणि 2 बहिणी असा परिवार आहे. त्यांचा पार्थिव देह उद्यापर्यंत हवाई दलाच्या खास विमानाने बेळगावात आणण्यात येणार असून, त्यानंतर सरकारी-लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


संबंधित बातमी: 


MP Plane Crash : मध्य प्रदेशात सुखोई-30 आणि मिराज-2000 कोसळले, एका पायलटचा करुण अंत; अपघात नेमका कसा घडला?