कोल्हापूर : विधायक चळवळीला लोकपाठबळ मिळाल्यास त्याचा वटवृक्ष कशा पद्धतीने होत जातो, याचा प्रत्यय किरकोळ अपवाद वगळल्यास कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात आला आहे. गणेशोत्सवात निर्माण होणारे शेकडो टन निर्माल्य पाण्यात टाकू नका तसेच गणेशमूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यासाठी कोल्हापुरात 1988 मध्ये मुठभर लोकांनी एकत्र लोकचळवळ सुरु केली होती. टोकाचा विरोध, वाद, प्रतिवाद असा मजल दरमजल करत या प्रवासाने गेल्या 35 वर्षांमध्ये मोठा टप्पा पार केला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात कोल्हापूर शहर आणि जिल्हा मिळून तब्बल 4 लाख 23 हजार 455 मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित करण्यात आल्या. 1988 मध्ये रंकाळा तलावाच्या काठावर निर्माल्य पाण्यात टाकू नका, गणपती विसर्जन पर्यायी पद्धतीने करून नद्या, तलाव सुरक्षित ठेवा यासाठी लोकचळवळ सुरू करण्यात आली होती. कोल्हापूरकरांनी एखादी गोष्ट मनावर घेतल्यास ते पूर्ण केल्याशिवाय मागे सरत नाहीत, याची प्रचिती गेल्या साडे तीन दशकांच्या प्रवासात आली आहे. 


एक नजर टाकूया आकडेवारीवर 



  • कोल्हापूर शहरात 76008 मूर्ती दान 

  • इचलकरंजीत 20000 मूर्ती दान 

  • इतर नगरपालिकांमध्ये 44307 मूर्ती दान 


अशा एकूण 2 लाख 81 हजार 51 मूर्ती पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जित झाल्या. त्याचबरोबर 100 टक्के निर्माल्य कोणत्याही नदी ,तलावात न टाकता पर्यायी पद्धतीने विसर्जित करण्यात आले. निर्माल्याचे खत बनवणे सुरू केलं आहे. 


अनंत चतुर्दशीला कोल्हापूर शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद 


कोल्हापूर शहरात सार्वजनिक गणेश मूर्ती 1014 व घरगुती 1078 अशा एकूण 2092 मूर्ती व सर्व निर्माल्य पर्यायी पद्धतीने विसर्जित करण्यात आले. याशिवाय अनेकांनी आपल्या घरातच मूर्ती विसर्जन केले. त्याची आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. अन्यथा हा आकडा निश्चित पाच लाखांवर गेला असता यात शंका नाही. 


ग्रामीण भागातून 2 लाख 83 हजारांवर मूर्ती दान : कोल्हापूर झेडपी सीईओ


कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्याशी एबीपी माझाने संवाद साधला. ते म्हणाले की, अनंत चतुर्दशीला ग्रामीण भागात 2 हजार 092 मूर्तीचे पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. घरगुती गणेश विसर्जनादिवशी 2 लाख 81 हजार पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ग्रामीण भागातून 540 मेट्रिक टनांवर निर्माल्य संकलित करण्यात आल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले.


ग्रामीण भागात मोहिम कशी राबवण्यात आली?


संतोष पाटील यांनी प्रत्येक ग्रामपंचायतीच्या सरपंचाना पत्र देण्यात आल्याची माहिती दिली. त्यांनी पुढे सांगितले की, गटविकास अधिकारी, तसेच त्यांच्या अखत्यारित असलेले अधिकारी यांची बैठक घेत कोल्हापूरची परंपरा अबाधित ठेवून वाढवायची आहे, अशा सूचना देण्यात आल्या होत्या. तालुक्यापासून ते गावपातळीपर्यंत आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषेदतून प्रत्येक तालुक्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आला होता. 


कोल्हापूरचा माणूस सकारात्मक बदल स्वीकारणारा 


स्वत: आपण अधिकाऱ्यांसह जाऊन प्रमुख विसर्जन स्थळ असलेल्या ठिकाणांची पाचव्या दिवशी पाहणी केल्याचेही संतोष पाटील यांनी सांगितले. पाटील यांनी पुलाची शिरोली, तसेच शिरोळ तालुक्यातील शिरढोणमध्ये पाहणी केली होती. एक टीम म्हणून सर्वांनी आपली कामगिरी पार पाडली. उदय गायकवाड यांच्यासारख्या कार्यकर्त्यांची सुद्धा मदत झाली. कोल्हापूरचा माणूस सकारात्मक बदल स्वीकारणारा असल्याचे त्यांनी सांगितले. 


कोल्हापूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक चळवळ आणखी पुढे नेण्यासाठी जिल्हाधिकारी, मनपा प्रशासक, कोल्हापुर महानगरपालिका, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, नगरपालिकांचे सर्व मुख्य अधिकारी, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच व ग्रामसेवक, अधिकरी व कर्मचारी यांनी दिलेलं योगदान, पर्यावरण कार्यकर्ते, स्वयंस्फूर्तीने काम करणारे ज्ञात अज्ञात हातांनी यामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या