Gokul Milk : महागाईचा आगडोंब सुरु असतानाच आता त्यामध्ये दूध दरामध्येही वाढ होत आहे. गोकुळ दूध संघाने दरवाढीचा दणका दिला आहे. गोकुळ दूध संघाने विक्री तसेच खरेदी दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्यापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. गोकुळकडून प्रतिलिटर दूध विक्री दरात 2 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता राजधानी मुंबईमध्ये 1 लिटर दुधासाठी 66 रुपये मोजावे लागतील. दूध खरेदी दरातही वाढ केल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. म्हशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपयांची तर गाईच्या दुधासाठी प्रतिलिटर एक रुपयाची वाढ करण्यात आली आहे.  


कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक म्‍हैस व गाय दूध खरेदी दरामध्‍ये 1 ऑगस्टपासून वाढ केली आहे. म्‍हैस दुधासाठी सरासरी प्रतिलिटर 2 रूपये व गाय दुधासाठी सरासरी प्रतिलिटर 1 रूपये वाढ केलेली आहे. 27 जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळाच्‍या बैठकीत दरवाढीबाबत निर्णय घेण्यात आला होता, अशी माहिती संघाचे अध्‍यक्ष विश्‍वास पाटील यांनी दिली.


1 ऑगस्टपासून म्‍हैस दूध खरेदी दर 6.0 फॅट व 9.0 एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर रूपये 45.50 दर राहिल व गाय दूध खरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एस.एन.एफ प्रतिचे दुधास प्रतिलिटर 30 रूपये होणार आहे. कोल्हापूर, मुंबई, पुणे विभागामध्‍ये वितरीत होणाऱ्या फुल क्रीम दूध विक्री दरात २ रुपये प्रतिलिटर वाढ करण्यात येणार आहे. तसेच गाय दूध, टोण्‍ड दूध, स्‍टँडर्ड दूध विक्री दरामध्‍ये कोणतीही वाढ करण्‍यात आलेली नाही. उद्या मध्यरात्रीपासून सदर दूध विक्री दरवाढ लागू होणार आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या