Kolhapur News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या विधानाचे राज्यभरात संतप्त पडसाद उमटत आहेत. ज्याप्रमाणे महाराष्ट्राची पैठणी, खाद्य संस्कृती आहे. तसा कोल्हापूरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. तोच कोल्हापूरचा जोडा राज्यपालांना दाखवण्याची वेळ आली असल्याचा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. राज्यपाल कोश्यारी यांनी हिंदूंमध्येही फूट पाडण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला आहे. कोश्यारी यांनी राज्यपालपदाची शान घालवली असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी दिली. 


यानंतर कोल्हापूमध्ये मिरजकर तिकटी परिसरात शिवसैनिकांनी राज्यपालांविरोधात जोरदार आंदोलन करत त्यांचा निषेध केला. यावेळी भल्यामोठ्या कोल्हापुरी चप्पलने सगळ्यांचे लक्ष वेधले. यावेळी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 


कोल्हापूरचा जोडा दाखवा


महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं आहेत, गड-किल्ले आहेत, पैठणीदेखील आहे. कोल्हापुरचा जोडादेखील प्रसिद्ध आहे. आता राज्यपालपदावर बसलेल्या व्यक्तीला कोल्हापुरचा जोडा दाखवण्याची वेळ आहे. सामान्य माणसाने कष्टातून कोल्हापुरी जोडा कसा प्रसिद्ध केला, हे दाखवण्यासाठी त्यांना हा जोडा दाखवावा असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 


कोश्यारी यांनी केलेले वक्तव्य हे अनावधानाने आले नसल्याचेही त्यांनी म्हटले. राज्यपालपदी असलेले कोश्यारी काही ठिकाणी खूपच सक्रिय असतात. तर, काही वेळेस अजगरासारखे सुस्त असतात अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली. राज्यपालांनी रखडवलेल्या 12 आमदारांच्या यादीचा मुद्दा उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला. राज्यपाल नियुक्त सदस्य नेमण्यासाठी अनुत्सुकता दाखवली. राज्यपाल नियुक्त सदस्य नको असतील तर त्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहायला हवे होते.