Bhagat Singh Koshyari controversial statement : महाराष्ट्राचे राज्यपाल पद स्वीकारल्यापासून बेताल वक्तव्ये करण्याचा विडाच उचललेल्या भगतसिंह कोश्यारी यांनी घटनात्मक पदावर असूनही गुजराती आणि राजस्थानी लोकांची जाहीर सभेत तळी उचलल्याने राज्यात संतापाची लाट उसळली आहे. 


सावित्रीबाई फुले यांचाही केलेला अपमान ताजा असतानाच आता राज्यपालांनी मराठी माणसाच्या मुळावर घाव घालणारी भाषा वापरल्याने राजकीय पक्षांसह सोशल मीडियामध्येही त्यांच्या विरोधात तीव्र आणि कडक शब्दात प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे राज्यपालांना नेहमीच संरक्षण देणाऱ्या भाजपने अंग काढून घेतले आहे. 


याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री आमदार सतेज पाटील यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर चांगलाच हल्ला चढवला आहे. त्यांनी हा प्रकार अपमानास्पद असल्याचे सांगत राज्यपालांनी माफी मागण्याची मागणी केली.


त्यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट करताना म्हटले आहे की, राज्यपाल हे अत्यंत महत्त्वाचे आणि प्रतिष्ठेचे पद असून वारंवार महाराष्ट्रातील थोर समाजसुधारक, क्रांतिकारक तसेच सर्वसामान्य मराठी माणसांचा वारंवार अपमान करत असून आम्ही त्यांचा तीव्र निषेध करत आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात 105 हुतात्म्यांनी बलिदान दिले असून लाखो मराठी माणसांच्या कर्तृत्वाने हे राज्य देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला दिशा देण्याचे काम करत आले. देशाची 'आर्थिक राजधानी मुंबई'  संदर्भात  अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या  राज्यपालांनी तात्काळ जाहीर माफी मागावी. लाखो लोकांना आधार देणारी ही 'आपली मुंबई' आहे. 


 भगतसिंह कोश्यारी नेमकं काय म्हणाले?


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari controversial statement) यांनी पुन्हा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. राज्यपालांनी महाराष्ट्राचा (Maharashtra) अपमान केला आहे असं म्हणत विरोधकांसह सामान्य नागरिकांनी त्यांच्यावर सवाल उपस्थित केले आहेत. गुजराती आणि राजस्थानी निघून गेले तर मुंबईत पैसाच उरणार नाही आणि मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही असं वक्तव्य भगसिंह कोश्यारींनी केलं आहे.  काल मुंबईतील अंधेरी पश्चिम भागात स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचं हे वक्तव्य म्हणजे महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांना नारळ द्या अशी मागणी आता विरोधकांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या