Dhananjay Mahadik : राज्यातील सत्तांतर आणि राज्यसभेवर खासदार धनंजय महाडिक गेल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणाचे चित्र पूर्णत: पालटून गेले आहे. आमचं ठरलंय म्हणून सतेज पाटील यांनी धनंजय महाडिक यांचा करेक्ट कार्यक्रम केला. त्यानंतर लागोपाठ जिल्ह्यातील सत्ताकेंद्रावर आपले बस्तान बसवले होते. आता सत्तांतर झाल्याने परिस्थिती पालटली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्नांवरून तसेच विमानतळाला मिळालेल्या नाईट लँडिंग परवानगीवरून सतेज पाटील आणि महाडिक गटात श्रेयवादाची लढाई रंगली आहे. त्यावरून टोमणेबाजीही सुरु झाली आहे. विमानतळाचा प्रश्न चार वर्षांपासून प्रलंबित होता. मी पाठपुरावा केल्यामुळे सुरू झाल्याचे धनंजय महाडिक म्हणाले. माजी मंत्री महोदयांनी बाकी खासदारांची नावे घेतली तशी माझंही नाव घ्यायला हवं होतं, असा टोलाही त्यांनी सतेज पाटील यांना लगावला. 


मी सत्ताधारी पक्षाचा खासदार असल्याने यश आल्याचा दावाही महाडिक यांनी केला. त्यांनी पाठपुरावा केला असेल तर मग काम का झालं नाही मंजुरी का आणली नाही? अशी विचारणा त्यांनी केली. कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गाचे काम मी खासदार असतानाच सुरू झाले होते. काम का थांबले याची माहिती मागवली आहे लवकरच ते सुरू होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले. 


झेडपी पंचायत निवडणुकीवर महाडिक काय म्हणाले?


गेली दोन अडीच वर्षांपासून काही लोक फारकत घेऊन होते. सत्ता बदल होताच ते संपर्कात येत आहेत, नव्याने पक्ष प्रवेश होणार आहेत. आगामी कोल्हापूर जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजप विचारांचे लोकच निवडून येतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्ंयक्त केला.


मंडलिकांनी चर्चा केली होती


खासदार संजय मंडलिक यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली होती. त्यांनी माझ्याशी सुद्धा भेट घेऊन चर्चा केली पण काय झाले हे विचारू नका, असे ते म्हणाले. राज्यातील सत्तांतराचा जिल्ह्यातील गोकुळ, जिल्हा मध्यवर्ती बँक अशा सहकारी संस्थांमध्ये बदल निश्चित दिसेल, असेही त्यांनी सांगितले. 


मला श्रेयवादात इंटरेस्ट नाही 


खासदारकीच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. आता काही गोष्टी सांगणार नाही. आम्ही जी विकास काम करत आहोत, त्यामध्ये  धनंजय महाडिक यांनी हस्तक्षेप करू नये असं विरोधकांनी सांगावं असे आव्हानही त्यांनी दिले. थेट पाईपलाईन कामात व्यस्त हस्तक्षेप करणार नाही, त्याचे यश अपयश श्रेय त्यांनीच घ्यावं, असा टोलाही त्यांनी लगावला. मला जे कोल्हापूर साठी करायचा आहे ते करणारच आहे. बास्केट ब्रिज होणार असल्याचा दावाही त्यांनी केला. 


इतर महत्त्वाच्या बातम्या