Kolhapur News : सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर कोल्हापूर मनपा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वेग आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मान्यतेनंतर राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर केला आहे. ओबीसी पुरुष / महिला, तसेच सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी सोडतीद्वारे आरक्षण काढण्यात येईल.


दरम्यान, अनुसूचित जातीच्या 12 जागांचे, तसेच अनुसूचित जमातीच्या एक जागेचे आरक्षण पूर्वी काढण्यात आलेल्या सोडतीप्रमाणेच राहणार आहे. कोल्हापूर महानगरपालिका    (Kolhapur municipal corporation elections 2022) प्रशासनाने त्रिसदस्यीय प्रभागानुसार आरक्षण सोडत काढली होती. परंतु, ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्याने ती प्रक्रिया रद्द करण्यात आली आणि आता नव्याने आरक्षण काढले जाणार आहे. जरी नव्याने आरक्षण काढले जाणार असले, तरी अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 12 प्रभाग आधीच निश्चित झाले आहेत. 


कोल्हापूर महापालिकेत सर्वसाधारण प्रवर्गासाठी असलेल्या 57 जागांमधून 28 जागा महिलांसाठी राखीव आहेत. ओबीसीमधील 22 पैकी 11 जागा महिलांसाठी आहेत, तर अनुसूचित जमातीसाठी एक जागा राखीव आहे. 


आरक्षण सोडत शुक्रवारी सकाळी अकरा वाजता केशवराव भोसले नाट्यगृहात काढली जाणार आहे. शनिवार, 30 जुलैला सोडतीनंतर प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. आरक्षण निश्चितीबाबत काही हरकती व सूचना दाखल करण्यासाठी 30 जुलै ते २ ऑगस्ट अशी वेळ दिली आहे, तर अंतिम आरक्षण 5 ऑगस्टला राजपत्रात प्रसिद्ध केले जाईल.


नगरपालिकांसाठी 28 जुलैला आरक्षण सोडत


कोल्हापूर जिल्ह्यातील 9 नगरपालिकांसाठी (kolhapur nagar palika election 2022) प्रवर्गनिहाय 28 जुलै रोजी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. यामध्ये इचलकरंजी महापालिका झाल्याने त्या  ठिकाणी आरक्षण सोडत काढली जाणार नाही. गडहिंग्लज, हुपरी, जयसिंगपूर, कागल, कुरुंदवाड, मलकापूर, मुरगूड, पन्हाळा आणि पेठवडगाव नगरपालिकांसाठी आरक्षण सोडत काढली जाईल. 


झेडपी, पंचायत समित्यांसाठी सुद्धा आरक्षण सोडत


कोल्हापूर झेडपीच्या 76 आणि पंचायत समित्यांच्या 152 जागांसाठी सुद्धा 28 जुलैला आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. ओबीसी आरक्षणामुळे 13 जुलैला आरक्षण सोडत स्थगित करण्यात आली होती. आता ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे.


कोल्हापूर जिल्हा परिषदेत 22 जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. 23 जागा सर्वसाधारण महिलांसाठी आहेत. अनुसूचित जाती पुरुष 5, तर 5 अनुसूचित जाती महिलांसाठी, तर 1 जागा अनुसूचित जमातीसाठी आहे. नागरिकांचे मागास प्रवर्ग 10 आहेत,  मागासवर्ग महिला 10 जागा आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या